आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे चार मुद्दे काळजीपूर्वक लक्षात ठेवा, विमा दावा सुलभरीत्या मिळवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणतेही विमा संरक्षण मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा विविध मार्गांनी आपण अगदी काही मिनिटांत विमा संरक्षण मिळवू शकतो. मात्र, जेव्हा विमा संरक्षण दाव्याची (क्लेम) वेळ येते तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच बहुतांश लोकांना विमा दावा कसा दाखल करावा याची माहिती नसते.सर्वसाधारणपणे विमाधारकांबाबत एखादी दुर्घटना झाल्यास क्लेम घेण्यासाठी अनेक दिव्यातून जावे लागते किंवा कागदांची पूर्तता करता करता वैताग येतो. हे सर्व टाळण्यासाठी विमा संरक्षण घेण्याबरोबरच क्लेमची प्रक्रिया माहिती करून घेणे अत्यावश्यक ठरते.

१) कसा कराल विमा संरक्षण दावा: कोणतीही दुर्घटना झाल्यानंतर त्यातून झालेल्या नुकसानीबाबत सर्वप्रथम ज्या कंपनीकडून पॉलिसी घेतली आहे त्या विमा कंपनीला माहिती द्यावी. दुर्घटना नैसर्गिक आपत्तीसंबंधी जसे- भूकंप, पूर, आग लागणे, चोरी, दरोडा आदी प्रकारची असेल तर त्याची माहिती जवळच्या पोलिस ठाण्यात देऊन त्याचा एफआयआर नोंदवावा.
- पॉलिसी देणाऱ्या कंपनीकडून क्लेमसंबंधी फॉर्म मिळवावा आणि त्यातील माहिती वाचून काळजीपूर्वक भरावी. - दाव्याच्या अर्जासोबत क्लेमशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे अवश्य जमा करावीत. यात पोलिसांत दिलेली तक्रार, डॉक्टरांचा अहवाल, पॅथॉलॉजिकल अहवाल व इतर आवश्यक कागदपत्रे यांचा समावेश आहे. - त्यानंतर पॉलिसी देणारी कंपनी दाव्याचा निपटारा करेल व विमाधारकाला सर्व रक्कम मिळेल.

२) नॉमिनीला माहिती असणे आवश्यक: विमा पॉलिसी घेणे जेवढे सोपे आणि सुलभ आहे तेवढेच विमा दावा घेणे अत्यंत किचकट आहे. एका कॉलवर विमा कंपन्या घरी येऊन पॉलिसी देतील, मात्र क्लेमची वेळ आल्यास अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. एका अहवालानुसार नॉमिनीपैकी १५ टक्के जणांना दावा कसा करतात हे माहिती आहे, तर ६० टक्के नॉमिनी यासाठी एजटांवर विसंबून असतात.

विमा दाव्यात अचूक कागदपत्रे सर्वात महत्त्वाची असतात. विमा क्लेम करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आणि कंपनीने मागणी केल्यास ती सादर करणे आवश्यक असते. यामुळे क्लेम तत्काळ मिळण्यास मदत होते.
३) नॉमिनीचे नाव : विमा दाव्यात नॉमिनीचे नाव असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे विमा पॉलिसी खरेदी करतानाच नॉमिनीचे नाव जाहीर करणे, नमूद करणे योग्य राहते. नॉमिनी नमूद न केल्यास दाव्याची रक्कम कोणाला द्यायची याबाबत संभ्रम निर्माण होतो. नॉमिनी अज्ञान असेल तर ती व्यक्ती सज्ञान (१८ वर्षे) झाल्यास तिला रक्कम देऊ शकेल अशा व्यक्तीचे नामकरण नमूद करावे. नॉमिनी नसल्यास कायदेशीर मार्गाने वारसाला क्लेमची रक्कम दिली जाते. अशा स्थितीत क्लेम मिळवण्यास जास्त अडचणी येतात.
४) दस्तऐवज: विमा दावा घेताना नॉमिनीचे ओळखपत्र द्यावे लागते. ओळखपत्र नसल्यास शपथपत्र द्यावे लागते. अकस्मात मृत्यू असल्यास मृत्यू प्रमाणपत्र तसेच एखाद्या अपघातात मृत्यू झाला असल्यास पोलिस तपास आणि एफआयआरच्या सत्यप्रती जोडाव्या लागतात.