आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investors Jumping On Date, Fund Demand In Booming Mood

गुंतवणूकदारांच्या डेटवर उड्या, फंडांना सुगीचे दिवस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. एप्रिल ते जून या तिमाही कालावधीत म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्ता 3.7 टक्क्यांनी वाढून ती विक्रमी 8.47 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. विशेष म्हणजे सलग पाच तिमाहींत ही वाढ नोंद झाली आहे. अगोदरच्या तिमाहीत व्यवस्थापनाखालील मालमत्ता 8.17 लाख कोटी रुपये होती.


रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातीमुळे डेट म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणावर निधीचा ओघ आल्यामुळे व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढण्यास मदत झाली असल्याचे क्रिसिलने आपल्या अहवालात म्हटले आहे. अहवालानुसार आगामी काळात व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने मोठ्या प्रमाणावर निधी येत असून त्यामुळे डेट आणि गिल्ट फंडांमधील व्यवस्थापनाखालील मालमत्ता वाढली आहे. दीर्घ मुदतीच्या डेट फंडांतील मालमत्ता 31 टक्क्यांनी वाढून 1.12 लाख कोटी रुपयांवर, तर गिल्ट फंडांतील मालमत्ता 10 टक्क्यांनी वाढून या तिमाहीत 8,600 कोटी रुपयांवर गेली आहे.


यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बँकिंग यंत्रणेतील खेळत्या भांडवलाच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यामुळे शॉर्ट टर्म डेट आणि अल्ट्रा शॉर्ट डेट फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तादेखील वाढली आहे. जूनअखेर संपलेल्या तिमाहीत शॉर्ट टर्म डेट फंडांची मालमत्ता 72,800 कोटी रुपयांवर, तर अल्ट्रा शॉर्ट टर्ममधील मालमत्ता 5,800 कोटी रुपयांनी वाढून याच कालावधीत 1.05 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.


इक्विटी फंडाकडे पाठ
इक्विटी फंडातील मालमत्तेत मात्र गेल्या सहा तिमाहींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. सलग सहाव्या तिमाहीत ही मालमत्ता जवळपास पाच टक्क्यांनी घसरून 1.99 लाख कोटी रुपयांवर गेली आहे. विशेष म्हणजे या तिमाहीच्या कालावधीत शेअर बाजारात चांगली वाढ झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर निधी काढून घेतल्यामुळे हा फटका बसला आहे.


गोल्ड ईटीएफची झळाळी उतरली
गोल्ड ईटीएफ व्यवस्थापनाखालील सरासरी मालमत्तादेखील जवळपास 11 टक्क्यांनी घसरून ती जूनअखेर संपलेल्या तिमाहीत 10,600 कोटी रुपयांवर आली आहे.