आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमाधारकांच्या हितासाठी होणार महत्त्वाचे बदल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वस्त पॉलिसी, फसवणूक नको यासाठी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाची मार्गदर्शक तत्त्वे :
विमाधारकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन त्यांची पूर्तता करावी, त्यांना स्वस्त दराने विमा उपलब्ध करून द्यावा, सध्याच्या विमा पॉलिसीद्वारे त्यांना मिळणा-या फायद्यांमध्ये वाढ व्हावी, विमाधारकांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने विमा पॉलिसी विकण्यावर नियंत्रण आणावे तसेच सर्व विमा पॉलिसी ग्राहकाभिमुख करून विमाधारकांच्या हिताचे संरक्षण करावे व त्याद्वारे आयुर्विम्याचा वेगाने प्रचार व प्रसार करून दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये वाढ करावी या हेतूने विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आयुर्विमा महामंडळ तसेच देशातील आयुर्विमा क्षेत्रातील सर्व खासगी विमा कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या सर्व विमा पॉलिसी 31 डिसेंबर 2013 पर्यंत बंद करावयाच्या असून आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश केलेल्या व त्यांची संमती घेतलेल्या नवीन पॉलिसीच 1 जानेवारी 2014 पासून विक्री करायच्या आहेत.
आयुर्विमा महामंडळ 34 लोकप्रिय पॉलिसी बंद करणार
आयआरडीएच्या आदेशानुसार आयुर्विमा महामंडळाने आतापर्यंत जवळपास 19 विमा पॉलिसी बंद केल्या असून उर्वरित 34 लोकप्रिय पॉलिसीज 31 डिसेंबरपासून बंद करणार आहे. आयुर्विमा महामंडळाने विमाधारकांच्या गरजा तसेच त्यांचे हित लक्षात घेऊन त्या अनुषंगाने जवळपास 50 नव्या विमा योजना, तर खासगी क्षेत्रातील प्रत्येक कंपनीने 12 ते 15 नवीन पॉलिसींचे प्रस्ताव आयआरडीएकडे सादर केले असून अशा 450 नवीन विमा योजनांपैकी जवळपास दोनतृतीयांश योजनांना आयआरडीएने आतापर्यंत संमती दिली आहे.
नवीन पॉलिसीजमधील महत्त्वाचे बदल
आयआरडीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 1 जानेवारी 2014 पासून आयुर्विमा पॉलिसींची प्रामुख्याने पारंपरिक, परिवर्तनीय व युलिप अशा तीन प्रकारच्या पॉलिसींमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. सर्व विमा कंपन्यांना आपल्या सध्याच्या सर्व विमा पॉलिसी 31 डिसेंबर 2013 पासून बंद करावयाच्या असून 1 जानेवारी 2014 पासून त्यांना आयआरडीए ने मंजुर केलेल्या नवीन पॉलिसीज फक्त विक्री करता येणार आहेत. अर्थात विमा कंपन्यांनी 31 डिसेंबर 2013 पूर्वी विकलेल्या विमा पॉलिसींचे त्या जर बंद स्थितीत असल्या तर त्यांचे विमाधारकांची इच्छा असल्यास पुनरुज्जीवन करता येईल. जुन्या ग्रुप पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमा कंपन्यांना त्या विमाधारकांना त्यांच्या जुन्या विमा पॉलिसीच्या सुधारित नवीन पॉलिसीचा पर्याय द्यावा लागेल. त्यांना जर नवीन सुधारित पॉलिसीचा पर्याय मान्य नसेल तर त्यांच्याकडून तसे लेखी घ्यावे लागेल व मगच त्यांच्या जुन्या पॉलिसीचे पुनरुज्जीवन करता येईल. युलिपधारकांना त्यांच्या पॉलिसीवरील परतावा जर कमी होत असेल तर विमा कंपन्यांना त्यासंबंधी दरमहा युलिपधारकांना ती माहिती कळवणे बंधनकारक राहील. परिवर्तनीय विमा पॉलिसींच्या बाबतीत त्यावर किमान कोणत्या दराने परतावा मिळेल याची हमी विमा कंपन्यांना द्यावी लागेल. सर्व परिवर्तनीय विमा पॉलिसी या युलिप पॉलिसीप्रमाणेच समजल्या जातील.
विमाधारकांच्या आर्थिक हिताचे बदल
1) सोडकिंमत : 1 जानेवारीपासून 10 वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या विमा पॉलिसींची सध्याच्या तीन वर्षांच्या ऐवजी दोन वर्षांनंतर सोडकिंमत घेता येईल. तसेच त्यापेक्षा जास्त मुदतीच्या विमा पॉलिसींची तीन वर्षांनंतर सोडकिंमत घेता येईल. सध्या पॉलिसीपोटी जमा झालेल्या विम्या हप्त्यांमधून पहिल्या वर्षाच्या विमा हप्त्याची रक्कम वजा करून त्याच्या तीस टक्के सोडकिंमत दिली जाते. आता वर नमूद दोन्ही प्रकारांमध्ये पहिल्या वर्षाच्या विमा हप्त्यांची रक्कम वजा न करता सर्व जमा रकमेवर 30 टक्क्याने सोडकिंमत दिली जाईल. चार ते सात वर्षे विमा हप्ते भरलेले असल्यास जमा विमा हप्त्यांच्या रकमेच्या 50 टक्के रक्कम सोडकिंमत म्हणून मिळेल.
2) मृत्यू लाभ : नवीन नियमानुसार 45 वर्षांपेक्षा कमी वय असणा-या व्यक्तींना वार्षिक विमा हप्त्याच्या रकमेच्या किमान दहापट, तर त्यापेक्षा जास्त वय असणा-या व्यक्तीला वार्षिक विमा हप्त्यांच्या किमान सातपट विमा छत्र असणे बंधनकारक असेल.
3) जन्म-मृत्यूच्या नवीन कोष्टकाचा वापर : सध्या व्यक्तीचे आयुर्मान वाढत आहे, परंतु विमा कंपन्या सध्या वापरत असलेल्या मॉरटॅलिटी टेबलमध्ये ते प्रतिबिंबित होत नाही. आता नवीन कोष्टकांचा वापर करून विमा पॉलिसीचा हप्ता ठरवावा लागणार आहे. त्यामुळे वाढत्या आयुर्मानाचा परिणाम म्हणून विमा हप्ता कमी होऊ शकेल.
4) विमा एजंटांचे कमिशन : विमा पॉलिसीची मुदत कमी असल्यास विमा एजंटांना कमी दराने कमिशन मिळेल व ती दीर्घमुदतीसाठी असल्यास कमिशनचा दर जास्त असेल.
5) सेवाकरही लागणार : आतापर्यंत आयुर्विमा महामंडळ विमाधारकांकडून सेवाकराची आकारणी करीत नव्हते. महामंडळ आपल्या संचित खात्यातून सदर रकमेचा भरणा सरकारकडे करीत होते. आता यापुढे सेवाकराची वसुली विमाधारकांकडून केली जाणार आहे.
या बदलांमुळे दूरगामी परिणाम
विमाधारकांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने विमा पॉलिसी विकल्या जाऊ नये यासाठी आयआरडीए सर्व परवानाधारक विमा एजंटांना खास प्रकारचे प्रशिक्षण देणार आहे. आयआरडीएच्या सदर बदलांमुळे विमा कंपन्यांच्या आर्थिक परिस्थितीवर फारच मोठा विपरीत परिणाम होणार आहे. सोडकिंमत, मृत्यू लाभ तसेच नवीन मॉरटॅलिटी टेबलचा वापर यामुळे विमा कंपन्यांच्या नफा मिळवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होईल. विमा क्षेत्र खुले झाल्यापासून बहुतांश खासगी विमा कंपन्या सातत्याने तोट्यात होत्या. आता 23 पैकी 14 कंपन्यांनी थोडा नफा मिळवण्यास सुरुवात केली आहे. यातील काही कंपन्यांचा नफा केवळ बंद पडलेल्या विमा पॉलिसींचे जास्त असलेल्या प्रमाणामुळे झालेला नफा आहे. बदलांमुळे आयुर्विमा महामंडळाच्या सरप्लसची रक्कम कमी होण्याची असल्याने विमाधारकांना मिळणा-या पॉलिसीवरील बोनसची रक्कमही कमी होण्याची शक्यता आहे.