आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवसागणिक वैद्यकीय उपचारांवरील खर्चात वाढ होत आहे. दरवर्षी या खर्चात 15 ते 20 टक्के वाढ होते. अशा स्थितीत आरोग्य विमाही रुग्णालयीन उपचारांचा खर्च भागवण्यास अपुरा पडतो आहे. एखाद्याने आरोग्य विम्याच्या सध्याच्या पॉलिसीचे विमा संरक्षण वाढवायचे ठरवले किंवा नवी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याचे ठरवले तर हे दोन्ही पर्याय महागडे ठरतात. त्यामुळे सध्याच्या पॉलिसीचे टॉप-अप आरोग्य विमा घेणे फायदेशीर ठरते.
रुग्णालयात उपचारांसाठी येणा-या मोठ्या खर्चापासून संरक्षण करण्यात टॉप-अप पॉलिसी महत्त्वाची ठरते. यातील सुविधा सर्वसाधारण आरोग्य विमा पॉलिसीप्रमाणेच असतात. यात काही आजारांशी निगडित वेटिंग कालावधी आणि एक्सक्लुजन्स असतात. जुन्या आजारांना काही काळानंतर संरक्षण मिळते. काही कंपन्यांनी याअंतर्गत मिळणा-या लाभात वाढ केली आहे. टॉप-अप पॉलिसीबाबत उपयुक्त माहिती अशी :
केव्हा लागू होते : सर्वसाधारणपणे रुग्णालयात एकदा अॅडमिट होण्याबाबतचे संरक्षण यात मिळते. या पॉलिसीबरोबर एक अट असते. एका निश्चित रकमेनंतरच टॉप-अप संरक्षण लागू होते, याला डिडक्टिबल असे संबोधतात. साधारणपणे टॉप-अपची रक्कम 3 ते 5 लाख रुपयांची असते.
केव्हा मिळतो क्लेम : रुग्णालयाचे बिल डिडक्टिबलपेक्षा जास्त असेल तर या पॉलिसीअंतर्गत क्लेम मिळतो. तसेच एका वर्षात एका वेळीच रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ही पॉलिसी लागू होते. याचा अर्थ असा की, तीन लाख रुपयांच्या डिडक्टिबल रकमेसह टॉप-अप पॉलिसी घेतली आहे व रुग्णालयाचा खर्च 3.5 लाख रुपये आला आहे. अशा स्थितीत डिडक्टिबल रकमेपेक्षा अधिक खर्च होणा-या 50 हजार रुपयांचा क्लेम या पॉलिसीअंतर्गत घेऊ शकता. मात्र, रुग्णालयात एका वर्षात दोन वेळा दाखल झाल्यास व बिल अनुक्रमे 2.5 लाख व 2 लाख रुपये झाल्यास ही पॉलिसी लागू होत नाही.
प्रीमियम कमी : नोकरदारांना बहुतेक वेळा नियोक्त्याकडून (कंपनी, संस्था, कार्यालये ) आरोग्य विमा मिळतो. त्यांच्यासाठी टॉप-अप अत्यंत उपयुक्त आहे. याचा प्रीमियम साधारण आरोग्य विमा पॉलिसीच्या तुलनेत कमी असतो. मूळ संरक्षणाच्या प्रीमियमपेक्षा तो 28 ते 30 टक्क्यांपर्यंत कमी असतो.
हे लक्षात ठेवा : आपल्या आरोग्य विमा पॉलिसीचा बारकाईने अभ्यास करा. डिडक्टिबल रक्कम मूळ पॉलिसीच्या विमा संरक्षणाइतकी किंवा त्यापेक्षा कमी असावी. सर्व एक्सक्लुजन, सर्व मर्यादा, पॉलिसी कागदपत्रातील शब्द लक्षपूर्वक वाचा व समजावून घ्या. टॉप-अप पॉलिसी मूळ पॉलिसीशी जुळणारी असणे आवश्यक आहे. मूळ पॉलिसीत जर आजार कव्हर होण्यासाठी 4 ते 5 वर्षे लागत असतील तर टॉप-अप पॉलिसीमध्ये हा काळ जास्त नसावा.
या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य टॉप-अप पॉलिसी निवडा. कमी खर्चात आरोग्य विम्याचे संरक्षण वाढवण्यासाठी टॉप-अप उपयुक्त ठरावे.
लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.