आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा एजंटवर विमाधारकांनी वर्तवला अविश्वास : अहवाल, असोचेमच्या अभ्यासात फक्त २९ टक्के लोकांनी व्यक्त केला विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विमा पॉलिसी खरेदी करणाऱ्या अनेक लोकांना विमा एजंटवर विश्वास नाही. अशा लोकांना आर्थिक बाबतीत चांगले ज्ञान असो किंवा नसो, त्यांनी विमा एजंटवर अविश्वास व्यक्त केला आहे. उद्योग संघटना असोचेमच्या वतीने करण्यात आलेल्या एका अभ्यास अहवालात ही बाब समोर आली आहे.
  
पॉलिसी खरेदी करताना विमा एजंटवर आम्ही सर्वात कमी विश्वास ठेवत असल्याचे मत या अभ्यास अहवालात सहभागी झालेल्या १८ ते ६० वर्षे वयाच्या ७२ टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. या लोकांना आर्थिक प्रकरणाबाबत जास्त माहिती नव्हती. या अविश्वासाबाबत विमा कंपन्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कंपनीवर विश्वास व्यक्त करणाऱ्या लोकांची संख्या फक्त २९ टक्के आहे. विविध विम्यासंदर्भात ग्राहकांना चुकीच्या लाभांची माहिती देणे चिंतेचा विषय झाला असल्याचे मतही या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आले आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २५ ते ४० वयोगटातील ६५ टक्के उत्तरदात्यांनी आपल्यासोबत धोका झाला असल्याचे सांगितले आहे. तर आर्थिक प्रकरणांची माहिती नसलेल्यांमधील ४३ टक्के लोकांनी चुकीची माहिती मिळाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागला असल्याचे सांगितले आहे. 
 
विमा कंपन्यांची प्रक्रिया तसेच कामकाज करण्याची पद्धत सुलभ करण्याची आवश्यकता असल्याचेही मत या अभ्यास अहवालाच्या निष्कर्षांत असोचेमने व्यक्त केले आहे. आर्थिकदृष्ट्या विमा पॉलिसीबाबत लोकांना कमी माहिती असते. त्यामुळे विमा काढण्याबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती पसरली असून त्यांचा भ्रम दूर करण्याची आवश्यकता आहे. अनेक विमा पॉलिसींमधील अटी खूपच किचकट आहेत. त्यामुळे विमा काढण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.  

एजंटच्या माध्यमातून प्रीमियम भरण्याचे प्रमाण घटले  
विमा नियामक इर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या २०१४-१५ च्या वार्षिक अहवालानुसार २०१२-१३ मध्ये एजंटच्या माध्यमातून जमा होणाऱ्या प्रीमियमचे प्रमाण ३९.६८ टक्के होते. ते २०१४-१५ मध्ये ३५.७३ टक्के राहिले आहे. यादरम्यान बँकांच्या माध्यमातून विक्री होणाऱ्या पॉलिसी प्रीमियमची संख्या ४३.०८ टक्क्यांवरून वाढून ४७.३७ टक्के झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...