आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युलिप खरेदीपूर्वी अटी लक्षात घ्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स. विमा छत्रासह गुंतवणुकीची संधी देणारे हे वित्तीय साधन आहे. यात प्रीमियमचा एक हिस्सा विमा संरक्षणासाठी तर उर्वरित हिस्सा इक्विटी अथवा कर्ज रोख्यात गुंतवला जातो. ही दोन वैशिष्ट्ये यात एकत्र असल्याने युलिपमध्ये अनेक शुल्कांचा समावेश होतो. यातील काही शुल्क आकारणी प्रारंभीच्या काळात तर काही पॉलिसीच्या पूर्ण कालावधीत लागू असते. यातील काही योजना निश्चित विमा संरक्षणाअंतर्गत हमीपात्र परतावाही देतात. मात्र, ही सर्व वैशिष्ट्ये माहितीपत्रकाच्या रूपाने आपल्यासमोर येतात तेव्हा त्या समजून घेणे अवघड होऊन बसते. यासाठी या बाबींविषयी माहिती असणे आवश्यक आहे...


इलस्ट्रेटेड रिटर्न म्हणजे काय : पॉलिसीच्या माहितीपत्रकात अनेक तक्ते तसेच ऑनलाइन कॅलक्युलेटरद्वारे करण्यात आलेले इलेस्ट्रेशन असतात. पॉलिसीचा कालावधी संपल्यानंतर किती रक्कम युलिपधारकाच्या पदरात पडेल याचे गणित यात मांडलेले असते. विमा नियामक इर्डाने ठरवून दिलेल्या 10 आणि 6 टक्के या परतावा प्रमाणावर यातील इलेस्ट्रेशनमधील रिटर्न दर्शवलेले असतात. पॉलिसीची पटकन कल्पना यावी, ती समजून घेता यावी हा यामागचा प्रमुख उद्देश असतो. यात दाखवण्यात आलेल्या परताव्याबाबत कोणतीही खात्री देण्यात आलेली नसते.
दुस-या एका नियमानुसार 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या पॉलिसीसाठी ग्रॉस तसेच निव्वळ (नेट) परताव्यात 3 टक्क्यांपेक्षा जास्त फरक नसावा, तर 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या पॉलिसीसाठी हा फरक 2.25 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये.
शुल्काकडे बारकाईने लक्ष द्या : प्रत्येक गुंतवणूकदाराने पॉलिसीच्या नोटस तर बारकाईने वाचाव्यातच परंतु माहितीपत्रकात देण्यात आलेले विविध तक्त्यांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. बहुतेक विमा कंपन्या अशाप्रकारचे शुल्क यात समाविष्ट नसल्याचे सांगतात. मात्र, वाढत्या वयाबरोबर लागणारे शुल्क योजनेतून मिळणा-या परताव्यावर परिणामकारक ठरू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या एकूण प्रीमियमच्या 1 ते 2 टक्क्यांपर्यत सेवा कर असू शकतो. जर गुंतवणूकदार तरुण असेल तर मार्टेलिटी चार्जेस कमी लागतील मात्र वयस्कर असले तर हे चार्जेस अपेक्षेपेक्षा जास्त असू शकतात. काही पॉलिसीमध्ये गॅरंटी चार्ज असतो, जर तुम्ही अशाच स्वरूपाची (गॅरेंटेड रिटर्न) पॉलिसी घेतली असेल तर गॅरंटी चार्ज आपल्या शुल्कात अंतर्भाव असण्याचे काहीच गरज नाही.याकडे लक्ष न दिल्यास अशा प्रकारच्या शुल्काबाबत माहिती देण्याचे एजंट टाळतो. वार्षिक प्रीमियमच्या साधारणत: 0.5 % गॅरंटी चार्ज आकारला जातो.


विविध कंपन्यांच्या युलिप पॉलिसीच्या अटी वेगवेगळ्या असतात. या संदर्भातील सविस्तर माहिती संबंधित कंपन्यांच्या संकेतस्थळावरून मिळवता येते. या शिवाय इंटरनेटवर सर्च करूनही अधिक माहिती मिळवता येते. असे केल्यास कोणत्याही मुद्द्याबाबत शंका किंवा संभ्रम दूर होतो.


लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.