Home »Business »Insurance» Post Office Become A Bank

बँक सुरू करण्यास टपाल खातेही सरसावले...

प्रतिनिधी | Feb 24, 2013, 00:40 AM IST

  • बँक सुरू करण्यास टपाल खातेही सरसावले...

मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन बँकिंग परवाना मिळवण्यासाठी शुक्रवारी जाहीर केलेल्या आपल्या अंतिम नियमावलीमध्ये बँकिंग सेवा उपलब्ध नसलेल्या देशाच्या ग्रामीण विभागात नवीन बँकांना किमान 25 टक्के शाखा उघडणे बंधनकारक केले आहे. ग्रामीण भागाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या जाळ्याच्या संधीचा लाभ उठवत भारतीय टपाल खात्यानेदेखील आता बँकिंग क्षेत्रात प्रवेश करून ‘पोस्ट बँक ऑफ इंडिया’ स्थापन करण्याचा विचार केला आहे.
ही बँक स्थापन करण्यासाठी टपाल खात्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. टपाल खात्याची ‘पोस्ट बँक’ ही केवळ ग्रामीण भागातल्या गरिबांच्या बँक गरजांची काळजी घेणार नाही, तर खात्यामार्फत दिलेल्या जाणार्‍या सूक्ष्म- विमा आणि सूक्ष्म रक्कम हस्तांतर सेवांची व्याप्तीदेखील वाढवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशभरातल्या 1.55 लाख टपाल कार्यालयांपैकी जवळपास 24 हजार जिल्हा कार्यालये पुढील दोन वर्षांच्या कालावधीत बँकिंग सेवा देण्यासाठी सज्ज होतील. इतकेच नाही, तर महत्त्वाकांक्षी माहिती तंत्रज्ञान प्रकल्पाचा एक भाग म्हणून देशभरातील टपाल शाखांना जोडण्यासाठी टपाल कार्यालये कोअर बँकिंग सोल्युशन्स प्रणालीने जोडून सक्षम करण्यात येतील. आरबीआयच्या नव्या परवाना निकषांची पूर्तता करावी लागणार आहे.
एटीएमचे जाळे विस्तारणार
०भारतीय टपाल खाते 1 हजार एटीएम सुरू करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. सर्व राज्यांमध्ये एटीएमचे जाळे विस्तारण्यासाठी मुख्यालयांची निवड टपाल खात्याने केली आहे. ‘एटीएम’ केंद्रांचे स्वरूप : आंध्र प्रदेश - 100, तामिळनाडू - 92, उत्तर प्रदेश - 73, महाराष्ट्र - 61, कर्नाटक - 60, केरळ - 51, राजस्थान - 51 .
०देशभरातील विद्यमान बँक शाखांची संख्या - 90 हजार
०पोस्ट ऑफिसमधील लघु बचत खाती : 26 कोटींपेक्षा जास्त; टपाल ठेवींचे प्रमाण : 1.9 लाख कोटी रु.
सल्लागाराची नियुक्ती
प्रस्तावित ‘पोस्ट बँक’ सुरू करण्याच्या दृष्टीने टपाल खात्याने ‘अर्न्स्ट अँड यंग’ची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ही सल्लागार कंपनी आपला अहवाल एप्रिलपर्यंत सादर करण्याची शक्यता आहे. त्यानंतरच बँकिंग परवाना मिळवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील, असे माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

Next Article

Recommended