आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Shah Article About Insurance,Divya Marathi

हॉस्पिटल डेली कॅश विमा योजनेबाबत..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाजारात सध्या अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी उपलब्ध आहेत. आयुर्विमा आणि आरोग्य (मेडिक्लेम) विम्याव्यतिरिक्त क्रिटिकल इलनेस, पर्सनल अँक्सिडेंट, गृह संरक्षण, हॉस्पिटल डेली कॅश आणि कर्मचारी विमा खरेदी करता येते. या वेळी हॉस्पिटल डेली कॅश इन्शुरन्स पॉलिसीबाबत माहिती घेऊया.. हॉस्पिटल डेली कॅश इन्शुरन्स पॉलिसीचा उद्देश रुग्णालयात दाखल झाल्यानंतर होणार्‍या इतर खर्चाची एकरकमी भरपाई करणे असा आहे. जेव्हा रुग्ण रुग्णालयात असतो तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयात राहावे लागते किंवा रोज येणे-जाणे करावे लागते. त्यांच्या येण्याजाण्यावर तसेच इतर बाबींवर खर्च होतो. ही पॉलिसी अशा स्वरूपाच्या खर्चाची भरपाई देते.
यात रोजच्या खर्चाची रक्कम तसेच एकूण दिवस यांची निवड करावी लागते. तशीच या पॉलिसीची रचना आहे. उदाहरणार्थ, यात 1000 रुपये रोजचा खर्च आणि जास्तीत जास्त 45 दिवस अशी योजना निवडता येते. समजा रुग्ण आयसीयूमध्ये दाखल असेल तर काही साधारण विमा योजनांपेक्षा या पॉलिसीत कॅश लिमिट दुप्पट होते. मात्र दिवसांची मुदत 7 ते 10 दिवसांपर्यंत र्मयादित होते.
काही आरोग्य विमा पॉलिसीत हॉस्पिटल कॅशचे संरक्षण मुख्य पॉलिसीत छोट्या घटकाच्या स्वरूपात समाविष्ट केलेले असते. मात्र, सर्व प्रकारच्या पॉलिसीत यांचा समावेश नसतो. त्यामुळे तुमच्या सध्याच्या आरोग्य विमा पॉलिसीत हे संरक्षण आहे का, याची खातरजमा करा. नसेल तर नूतनीकरणाच्या वेळी रायडरच्या स्वरूपात हे संरक्षण पॉलिसीत समाविष्ट करू शकता. भारंभार विमा पॉलिसी घेण्याचे टाळा. एकाच पॉलिसीत क्रिटिकल इलनेस आणि पर्सनल अँक्सिडेंट संरक्षणासह हॉस्पिटल कॅश बेनिफिटचा लाभ असणारी योजना निवडावी. समजा 30 वर्षीय व्यक्ती 1000 रुपयांच्या हॉस्पिटल डेली कॅशसह जास्तीत जास्त 45 दिवसांसाठी ही पॉलिसी घेत असेल तर त्याला विम्यासाठी वर्षाकाठी 1200 रुपये खर्च येतो. त्यामुळे हे संरक्षणाच्या खर्चाच्या बाबतीत स्वस्त पडते. जेव्हा विमाधारक रुग्णालयात असतो तेव्हा इतर खर्चाची पूर्तता याद्वारे करता येते.
शक्यतो स्वत:साठी तसेच पत्नीसाठी हॉस्पिटल डेली कॅश पॉलिसी घ्यावी. मुलांसाठी ही पॉलिसी घेण्याची गरज नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा स्वरूपाच्या पॉलिसीसाठी जास्त खर्च येतो. ही पॉलिसी घेण्यापूर्वी स्वत:चा आरोग्य विमा (मेडिक्लेम) आणि पुरेसा आयुर्विमा असणे आवश्यक आहे. हे दोन्ही घटक आपल्या विम्याच्या मूळ गरजांची पूर्तता करतात. त्यानंतर हॉस्पिटल डेली कॅश संरक्षण घेता येते.ही पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी त्याचे नियम व अटी समजावून घ्या. या पॉलिसीचा फायदा घेण्यासाठी रुग्णालयात किमान दोन दिवस दाखल असणे आवश्यक असल्याची अट यात असू शकते. पूर्वीपासून असणारे आजार या पॉलिसीत दोन ते चार वर्षांपर्यंत संरक्षित होत नाहीत. काही ठरावीक आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी असू शकतो. प्रारंभी हा कालावधी 30 दिवसांचा असतो.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
rohit.shah@dainikbhaskargroup.com