आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटा बंद : दहा ग्रॅम सोन्यास ५५,००० रुपये देण्याची धनिकांची तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई/ जयपूर - सरकारच्या वतीने मोठ्या नोटा बंद केल्यानंतर मंगळवारी देशभरातील अनेक ठिकाणी लोकांनी सोने खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. ग्रे-मार्केटमध्ये ग्राहक दहा ग्रॅम सोन्यासाठी ५५,००० रुपयांपर्यंत किंमत देण्यासाठी तयार होते. तरीदेखील सराफा विक्री करू शकत नव्हते. इंदूरमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ४५,०००, जयपूरमध्ये ५३,००० आणि अहमदाबादमध्ये ३४,००० रुपयांपर्यंत पोहोचल्या होत्या. मोठ्या सोनारांनी रात्री १२ वाजेपर्यंत आपली दुकाने सुरूच ठेवली होती.

देशभरातील सोने-चांदी दुकानातील मागणी मंगळवारी रात्री अचानक २०० टक्क्यांनी वाढली, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. ज्वेलरी उद्योग दररोज सरासरी दोन टन सोने विक्री करतो. मात्र, मंगळवारी एकाच दिवसात सहा टन सोन्याची विक्री नोंदवण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याची घोषणा केली होती.

त्यानंतर लोकांनी आपल्याजवळील काळ्या पैशाचे रूपांतर सोन्यात करणे योग्य समजले. अचानक मागणीत वाढ झाली. मागणी - पुरवठा तफावतीमुळे सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली.

बुधवारी सोन्याचा भाव ३१,७५० रुपये
बुधवारी दिल्लीत सोने ९०० रुपयांनी वाढले. प्रति दहा ग्रॅममागे ३१,७५० रुपये भाव होता. १९ नोव्हेंबर २०१३ नंतर म्हणजेच तीन वर्षात हा सर्वात जास्त भाव आहे. त्या दिवशी प्रति दहा ग्रॅममागे याचा दर ३१,८२० असा होता. तर मंगळवारी सोन्याचा भाव ३०,८५० रुपये होता. स्थानिक बाजारात चांदीच्या किमतीतही तेजी पाहायला मिळाली. याचे दर १,१५० रुपये म्हणजेच २.६२ टक्के वाढून प्रतिकिलो मागे ४५,००० रुपये असे होते. मागील पाच आठवड्यात हा दर सर्वाधिक आहे.

जागतिक बाजारात सोने ५% तेजीत
अमेरिकी राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सुमारे ५ टक्क्यांच्या तेजीसह विक्री झाले. पाच आठवड्यांतील ही सोन्याची सर्वोच्च पातळी आहे. सिंगापूर बाजारात सोने ४.८ टक्क्यांच्या वाढीसह १,३३७.३८ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. जून महिन्यानंतर ही सर्वाधिक वाढ आहे.

महागण्याची प्रमुख कारणे
- मोठ्या नोटा बंद झाल्यामुळे काळ्या पैशातून सोने खरेदी केले.
- शेअर बाजारात घसरण दिसून येत असल्यामुळे लोकांनी आपला पैसा काढून सोन्यात गुंतवला.
- मोठ्या प्रमाणात सोन्याला सुरक्षित पर्याय मानले तसेच खरेदी केली.

ज्वेलरी उद्योगाने केले स्वागत
काळ्या पैशावर नियंत्रणासाठी योग्य पाऊल. यामुळे सध्या त्रास असला तरी फायदा होईल.
-अशोक मीनावाला, संचालक, आॅल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी ट्रेड फेडरेशन
या निर्णयाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. यामुळे रुपया मजबूत होण्यासाठी मदत मिळेल.
-प्रवीणशंकर पंड्या, जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काैन्सिल
कर चोरीवर नियंत्रणास मदत मिळेल. कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या दिशेने हा निर्णय मैलाचा दगड ठरेल.
-सोमसुंदरम पी.आर., जागतिक सुवर्ण परिषद.
गोल्ड ईटीएफ, सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये तेजी
काळ्या पैशावर नियंत्रणासाठीच्या निर्णयामुळे बाजारात गुंतवणूकदारांचा कल ईटीएफ तसेच सुवर्ण रोखे खरेदीकडे होता. बाजारात प्रारंभी गोल्ड एक्स्चेंजमध्ये ३% वाढ दिसली. एचडीएफसी गोल्ड ईटीएफ २,९०० रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचले. सुवर्ण रोख्यातही ४ टक्के तेजी दिसून आली. एमसीएक्समध्ये सोन्याच्या व्यवहारात तेजी होती, तर वायदा सौद्यात घसरण दिसून आली.
बातम्या आणखी आहेत...