नवी दिल्ली- स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय स्टेट बँकेत इतर पाच सहयोगी बँकांच्या तसेच महिला बँकेच्या विलीनीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा िनर्णय घेण्यात आला आहे.
स्टेट बँक ऑफ बिकानेर अॅँड जयपूर (एसबीबीजे), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक अॉफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचा विलीनीकरण होणाऱ्या बँकांमध्ये समावेश आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय जाहीर होताच एसबीआयसह या चार बँकांच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची तेजी दिसून आली.
या सर्व प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी मार्च २०१७ पर्यंतची मुदत देण्यात आली असून येत्या दोन महिन्यांत या संदर्भातील रेश्यो निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. विलीनीकरण प्रक्रिया झाल्यानंतरदेखील कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बँकांच्या सोबतच महिला बँकेच्या विलीनीकरणाला देखील मंजुरी देण्यात आली आहे.
इतर बँकांवर लक्ष : पाच बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयानंतर इतर छोट्या बँकांच्या विलीनीकरणासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अर्थमंत्रालयातील सूत्रांनी िदली आहे. यासाठी बँक बोर्ड ब्युरो प्रयत्न करणार आहे. या अंतर्गत युनायटेड बँक ऑफ इंडियासह इतर बँकांच्या विलीनीकरणाची शक्यता तपासली जाणार आहे. नव्या खासगी बँकांशी स्पर्धा वाढली आहे. हे पाहता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देखील मजबूत करणे आवश्यक असल्याचे मत वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
बँलेन्स शीट सुधारणार
पाच बँकेचे विलीनीकरण एसबीआयमध्ये झाल्यानंतर या बँकेची बँलेन्सशीट सुमारे ३७ लाख कोटी रुपयांनी होणार आहे. त्यानुसार जगभरातील ५० सर्वात मोठ्या बँकांमध्ये एसबीआयचादेखील समावेश होणार आहे.
बँकांच्या स्टॉक्समध्ये तेजी
विलीनीकरणाचा निर्णय घेतल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर सहकारी बँकांच्या स्टॉक्समध्ये तेजी नोंदवण्यात आली. मुंबई राष्ट्रीय शेअर बाजारात यातील बँकांचा यादीत समावेश आहे. यात एसबीआयच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांपर्यंतची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर एसबीबीजेच्या स्टॉक्समध्ये सुमारे १९ टक्क्यांची वाढ दिसून आली. स्टेट बँक अॉफ म्हैसूरचे शेअर २० टक्क्यांच्या तेजीसह सर्वोच्च पातळीवर राहिले. हा गेल्या ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. स्टेट बँक ऑफ त्रावणकोरच्या शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली.