आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेने ४५० रुपये स्वस्त, चार महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आयात घटली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विदेशी बाजारात भाव कमी झाल्याने तसेच ज्वेलर्स-रिटेलर्सकडून मागणी नसल्यामुळे मंगळवारी सोन्याचे भाव ४५० रुपयांनी कमी झाले आहे. सोने २५,७०० रुपये प्रतितोळ्याने विक्री झाले. गेल्या चार महिन्यांतील ही नीचांकी पातळी आहे. ९९.५ टक्के शुद्ध साेनेदेखील इतकेच स्वस्त झाले आहे. ते सोने २५,५५० रुपयांवर आले आहे. २० जुलै नंतरची ही सर्वात कमी किमत आहे.

दुसरीकडे चांदीदेखील ५०० रुपयांनी स्वस्त झाली असून ३४,१०० रुपये किलाने विक्री झाली. विदेशी बाजारात सोने पुन्हा एकदा पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. सिंगापूरमध्ये सोन्याचे भाव ०.४ टक्क्यांनी घटून १०७८.०७ डॉलर प्रतिऔंसवर आले आहेत. भारतात सोन्याचे भाव विशेष करून सिंगापूरप्रमाणेच कमी जास्त होत असतात. सोमवारी न्यूयॉर्कमध्येदेखील सोने ०.१७ टक्क्यांनी स्वस्त होऊन १०८२.१० डॉलरवर आले होते. तेथे वायदामध्ये भाव ०.६ टक्क्यांनी घटून १०७७.५० डॉलरवर आले आहेत. मेलबर्नमध्ये सोने हाजिर ०.३७ टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. सोन्याची ट्रेडिंग १०७८.४६ डॉलर प्रतिऔस भार झाली.

फेडरल व्याजदर वाढ
अमेरिकेतील फेडरल रिजर्व्ह बँकेमुळेच आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव कमी होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फेडरल रिझर्व्हच्या वतीने लवकरच व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या शंकेमुळे बाजारात सोन्याची मागणी कमी झाली आहे. तसेच इतर देशांच्या प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर अधिक मजबूत झाला आहे. या सर्वांचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला असून त्यामुळेच जागतिक बाजारात सोन्याचे भाव कमी होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

जगभरातील मागणी घटली
सोन्याची सर्वात जास्त मागणी असलेल्या भारत आणि चीनमधील ग्राहकांनी सोन्याची मागणी कमी केली आहे. भारतीय अर्थ मंत्रालयाच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात देशात सोन्याची आयात कमी झाली असून १.७ अब्ज डॉलरचेच सोने देशात आयात झाले आहे. आतापर्यंतच्या सोन्याच्या आयातीची तुलना केल्यास ऑक्टोबर २०१४ पेक्षाही आयात ५९.५ टक्के कमी आहे.

मुंबईत भाव घसरले
मुंबई सराफा बाजारात सोन्याचा भाव २६५ रुपयांनी कमी होऊन २५,४७५ रुपये प्रति तोळ्यावर आला. सोमवारी मुंबईत सोने २५,७४० रुपये प्रतितोळ्याने विक्री झाले होते, तर चांदीच्या भावातदेखील किलोमागे ३४० रुपये कमी झाले आहेत. साेमवारी चांदी ३५,१०५ रुपये प्रति किलो दराने विक्री झाली. मंगळवारच्या बाजारात चांदीची ३४,७६५ रुपये प्रति किलोग्रॅमने विक्री झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत कमी असली तरी भारतात दिवाळी आणि इतर सणासुदीच्या दिवसात सोन्याची आयात कमी झाली आहे.

सोन्याची आयात घटली
ऑक्टोबरमध्ये सोन्याची आयात ५९.५५ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या महिन्यात १७०.१३ कोटी डॉलरचे सोने आयात झाले होते. ही आयात जानेवारीनंतरची नीचांकी पातळी आहे. जानेवारी २०१५ मध्ये १५७.२४ कोटी डॉलरचे सोने आयात करण्यात आले होते. गेल्या वर्षी भारतात ऑक्टोबरमध्ये ४२०.५७ कोटी डॉलरचे सोने आयात झाले होते. जुलै महिन्यात सोन्याची आयात ६२.२ टक्के आणि ऑगस्ट महिन्यात १४० टक्क्यांनी वाढली.