आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी रिझर्व्ह बँकेप्रमाणे व्याजदर घटवले तर वर्षाला ‌‌13536 रुपचांची बचत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१५ पासून रेपो दरात १.७५ टक्क्यांनी कपात केली आहे. व्यापारी बँकांनी मात्र हा लाभ सरसकट ग्राहकांना न देता कर्ज स्वस्त करण्यात हात आखडता घेतला आहे. या दोन वर्षांत बँकांनी कर्जावरील व्याज दरात केवळ ०.८० ते ०.९० टक्के इतकीच कपात केली आहे. या उलट मुदत ठेवींवरील (एफडी ) वरील व्याज दरात मात्र एक ते सव्वा टक्का कपात केली आहे. 

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पतधोरण आढाव्यात त्यामुळेच बँकांना खडसावले. नोटाबंदी नंतर उद्भवलेल्या परिस्थितीत बँकांनी सर्व प्रकारचे  कर्ज स्वस्त करायला हवे असे मत सर्व क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे. कर्ज स्वस्त करण्यात आखडता हात आणि एफडीचे व्याजदर घटवण्यात तत्परता यामुळे ग्राहकांना दुहेरी फटका बसत आहे.
 
फेब्रुवारीत जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर ६.२५ टक्क्यांवर जैसे थे ठेवण्यात आला. रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१५ पासून आतापर्यंत रेपो दरात १.७५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर अर्थात बँकांना अल्प काळ मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर सातत्याने घटत असताना, बँकांनी मात्र याचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्यात कानाडोळा केला आहे. सर्व प्रमुख बँकांनी या दोन वर्षांच्या काळात गृह, वाहन, वैयक्तिक तसेच औद्योगिक कर्जावरील व्याजदरात केवळ ०.८० ते ०.९० टक्के इतकीच कपात केली आहे.

वाढत्या एनपीएची बँकांसमोर अडचण
कर्ज स्वस्त करण्यास बँकांना सध्या वाव नाही. कारण मागील दोन वर्षांत व्यापारी बँकांच्या उत्पन्नात घट  होऊन अनुत्पादक कर्जाचा (एनपीए) भार  वाढला आहे. त्यामुळे आरबीआयने केलेली कपात जशास तशी ग्राहकांना देणे तूर्तास अशक्य आहे - देविदास तुळजापूरकर, सहसचिव, एआयबीईए, औरंगाबाद.

...तर अशी होईल बचत
बँकांनी रेपो दर कपातीचा संपूर्ण लाभ ग्राहकांना द्यायचे ठरवले तर घरांसह सर्व कर्जावरील व्याज दर आणखी ०.८५ ते ०.९० टक्क्यांनी घटतील. त्यामुळे नवे घर घेण्याचे सर्व सामान्यांचे स्वप्न साकारणे आवाक्यात येईल. उदाहरण सांगायचे झाले तर, समजा एखाद्याने २० लाख रुपयांचे २० वर्षे मुदतीचे गृहकर्ज घेतले तर सध्या त्याला ८.६५ टक्के व्याज दर आहे. बँकेने रिझर्व्ह बँकेच्या दर कपातीचा पूर्ण लाभ देण्याचे ठरवले तर व्याज दर ९० मूळ अंकांनी घटून ७.७५ टक्के होईल. त्यामुळे त्याची वर्षाकाठी १३५३६ रुपयांची बचत होईल.
बातम्या आणखी आहेत...