नवी दिल्ली - आयकर भरणा ऑनलाइन दाखल करण्याची सुविधा देण्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. विभागाला या वर्षी ७ सप्टेंबरपर्यंत ई-फायलिंग पोर्टलच्या माध्यमातून २.०६ कोटी करदाते मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या १.६३ कोटी करदात्यांपेक्षा हा आकडा २६.१२ टक्के जास्त आहे. अर्थमंत्रालयाच्या वतीने गुरुवारी ही माहिती जाहीर करण्यात आली. या माहितीनुसार सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर (सीपीसी)ने आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ७ सप्टेंबरपर्यंत भरणा वर्ष २०१५-१६ साठी ४५.१८ लाख रिटर्नची प्रोसेसिंग केली. सोबतच २२.१४ लाख रिफंडदेखील दिले आहेत.
विभागाने पोर्टलच्या माध्यमातून ३२.९५ लाख ई-रिटर्नचे इलेक्ट्रानिक माध्यमातून पडताळणी केली. गेल्या महिन्यात सुरू करण्यात आलेल्या ई-फायलिंग प्रणालीच्या माध्यमातून आयकरदात्याच्या आयकर भरण्यासाठीच्या आधार नंबर, इंटरनेट बँकिंग, एटीएम किंवा ई-मेलच्या माध्यमातून पडताळणी करू शकते. यामुळे बंगळुरू कार्यालयात आयकराची प्रत पाठवण्याची आवश्यकतादेखील संपली आहे.