आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाहन परवाना जमा केल्यास स्वस्तात मिळेल नूडल-सूप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागोया (जपान) - जपानमधील आइची परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आवडते नूडल्स आणि सूप स्वस्तात भेटत असल्यामुळे ते सध्या खूपच आनंदी आहेत. जपान पोलिस आणि नूडल्स बनवणारे सुप्रसिद्ध रेस्तराँ चेन सुगाकिया यांच्यामध्ये सवलत देण्यासंबंधी एक करार झाला आहे. या करारानुसार आपला वाहन परवाना जमा (ड्रायव्हिंग लायसन्स सरेंडर) करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला सूप आणि नूडल्सवर १५ टक्क्यांची सूट देण्यात येत आहे. या पुढाकारामुळे ऑक्टोबर महिन्यात सुमारे १२ हजार ज्येष्ठ नागरिकांनी आपले वाहन परवाने जमा केले आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने होत असलेल्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी अशा प्रकारचा करार करण्यात आला आहे. परवाना जमा केल्यानंतर पोलिसांच्या वतीने या ज्येष्ठ नागरिकांना एक प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यानंतर हे प्रमाणपत्र दाखवून सुगाकियाच्या सर्व १७६ आऊटलेट्स तसेच रेमन नूडल्सच्या स्टोअरमध्ये लोकप्रिय नूडल्स आणि सूपवर सूट मिळेल. ही सूट रेमनच्या भात तसेच सलाडवरदेखील लागू असेल.

अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पोलिसांच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. हादेखील त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. ज्येष्ठ नागरिकांनी वाहन परवाना जमा केल्यास त्यांना “ड्रायव्हिंग ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट’ देण्याची योजना टोकियो पोलिसदेखील चालवत आहेत. हेच प्रमाणपत्र दाखवून ज्येष्ठ नागरिक विविध प्रकारच्या सवलती मिळवत आहेत.
वास्तविक जपानमध्ये गेल्या काही वर्षांत ज्येष्ठ नागरिकांकडून वाहन अपघाताची संख्या वाढली आहे. यातील काही अपघात अत्यंत गंभीर स्वरूपातील आहेत. या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी उपायांवर देशभरात चर्चा सुरू आहे. ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून त्यांना त्यांचा वाहन परवाना जमा करण्यासाठी तयार करण्यात यावे. फूड चेनसोबत झालेल्या या करारानुसार ५९० जपानी येन (३६१ रुपये) मध्ये मिळवणारी मील प्लेट सवलतीमध्ये ५०० येन (३०६ रुपये) मध्ये मिळेल. याच मील प्लेटमध्ये नूडल्स, ब्रॉथ सूप, रेमन राइस आणि सलाद यांचा समावेश आहे.

या समस्येचा सामना करण्यासाठी आयची पोलिसांनी गेल्या चार वर्षांपूर्वीच विविध संशोधन संस्था आणि सामाजिक संस्थांशी चर्चा करण्यास सुरुवात केली होती. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा वाहन परवाना जमा करून वाहन चालवणे सोडल्यास मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या कमी होऊ शकते, असा निष्कर्ष यामध्ये निघाला. या रेस्तराँच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही समजासोबत मिळूनच बिझनेस करत असल्यामुळे आमचीदेखील सामाजिक सुरक्षेसंबंधी जबाबदारी आहे. त्यामुळेच कंपनीने पोलिसांसोबत मिळून सामाजिक भागीदारी पूर्ण केली आहे.

गेल्या आठवड्यात ९७ वर्षीय एक बौद्ध पुजारी ता शिनेन यांनी सार्वजनिकरीत्या आपला वाहन परवाना पोलिसांकडे जमा केला. पोलिसांच्या या पुढाकाराला माझा पाठिंबा असून इतर ज्येष्ठ नागरिकांनादेखील प्रोत्साहन देण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. कितीही लक्ष देऊन गाडी चालवली तरी चूक होण्याची शक्यता असते. फक्त चमकोगिरी करण्यासाठी वाहन परवाना ठेवणे मूर्खपणाचे असल्याचेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...