आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाऊक महागाई 3.41%, आयआयपी दरात वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटाबंदीचा दबाव असतानाच औद्योगिक उत्पादन तसेच महागाई दराची जाहीर झालेली आकडेवारी मोदी सरकारसाठी दिलासा देणारी ठरली आहे. नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक आयआयपीमध्ये  ५.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०१५ मध्ये आयआयपी विकास दर उणे ३.४ टक्के नोंदवण्यात आला होता, तर डिसेंबर महिन्यात घाऊक महागाई दर ३.६३ टक्क्यांवरून कमी होऊन ३.४१ टक्के नोंदवण्यात आला आहे. उत्पादन तसेच इलेक्ट्रिसिटी क्षेत्रात नोंदवण्यात आलेल्या तेजीमुळे आयआयपी आकडेवारीत वाढ नोंदवण्यात आली आहे.  

केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या वतीने बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार उत्पादन क्षेत्रातील वाढ उणे ४.६ टक्क्यांच्या तुलनेत ५.५ टक्के नोंदवण्यात आली आहे. याचप्रमाणे इलेक्ट्रिसिटी क्षेत्रातील वाढ ०.७ टक्क्यांच्या तुलनेत या वेळी ८.९ टक्के नोंदवण्यात आली आहे. 
 
कच्च्या तेलाचा परिणाम  
जागतिक बाजारात आेपेक देशांसह इतर तेल उत्पादक देशांनी कच्च्या तेलाच्या दररोजच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. अमेरिकी बाजाराचाही कच्च्या तेलाच्या किमतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे तेलाच्या महागाई दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. तेलातील महागाई दर २.८० टक्क्यांवरून वाढून ३.७७ टक्के झाला आहे.
 
महागाई दरावर नोटाबंदीचा परिणाम  
महागाई दरावर नोटाबंदीचा परिणाम दिसून आला. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील घाऊक महागाई दरात घट नोंदवण्यात आली आहे. खाद्यपदार्थाचे भाव कमी झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात महागाई दर ३.६३ टक्क्यांवरून कमी होऊन ३.४१ टक्के नोंदवण्यात आला आहे. यादरम्यान दूध, साखर आणि डाळींच्या किमती कमी झाल्या आहेत. डाळी स्वस्त झाल्या असून डाळींमधील महागाई दर ०.२३ टक्क्यांवरून कमी होऊन उणे १.५७ टक्क्यांवर आला आहे. दुधाचा विचार केल्यास घाऊक बाजारातील दुधातील महागाई दर ४.५ टक्क्यांवरून कमी होऊन ४.४० टक्क्यांवर आला आहे. साखरेतील घाऊक महागाई दरातही घट झाली असून २२.४० टक्क्यांवरून कमी होऊन २१.०६ टक्के झाला आहे.