आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराशाः सरकारचा दबाव वाढूनही व्याजदर पुन्हा ‘जैसे थे’; महागाईने रोखली व्याजदर कपातीची वाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - व्याजदर कमी करण्यासाठी सरकारकडून दबाव वाढूनही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन शेवटी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अन्नधान्याच्या वाढत्या किमतींनी पुन्हा एकदा व्याजदर कपातीची वाट रोखली. महागाईबद्दल चिंता व्यक्त करताना राजन यांनी आपल्या तिसऱ्या मासिक नाणेनिधी धोरण आढाव्यात पुन्हा एकदा ‘जैसे थे’ भूमिकाच कायम ठेवली. त्यामुळे आता पुढच्या व्याजदर कपातीसाठी २९ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
रिझर्व्ह बँकेने अल्पमुदतीच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला नसून रोख राखीव प्रमाण चार टक्क्यांवर तर वैधानिक रोकडसुलभतेचे प्रमाण २१.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. किरकोळ महागाई जून महिन्यात आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेली असल्यामुळे रिझर्व्ह बँकेला चिंता लागली आहे. याअगोदर रघुराम राजन यांनी दोन जून रोजी रेपो दरात पाव टक्क्याने कपात केली होती.

नाणेनिधी आढाव्यामध्ये आझर्व्ह बँकेने जानेवारी - मार्चसाठी ग्राहक किंमत निर्देशांकातील महागाईचा अंदाज ०.२ टक्क्यांनी कमी केला आहे.

व्याजदर कमी न होण्याची कारणे

- मान्सूनच्या प्रगतीचे चित्र अद्याप स्पष्ट नाही
- याअगोदर झालेल्या व्याजदर कपातीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचलेला नाही
- अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदराच्या धोरणाची प्रतीक्षा
- अन्नधान्याच्या महागाईत वाढ

विकासदर ७.६ टक्के राहण्याचा अंदाज
देशाच्या आर्थिक विकासदरात सुधारणा झालेली बघायला मिळणार असून २०१५-१६ वर्षात हा दर ७.६ टक्क्यांची मजल गाठेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे. तसेच लहान आणि पेमेंट बँकांसाठी ऑगस्ट महिना संपण्याच्या अगोदरच परवान्यांची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढच्या नाणेनिधी धोरणाअगोदर व्याजदर कपात शक्य
पुढील नाणेनिधी धोरण आढावा २९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. परंतु त्याअगोदर व्याजदर कमी होऊ शकतात, असे संकेतही राजन यांनी दिले आहेत. परंतु ही कपात अार्थिक वाढीच्या आकडेवारीवर अवलंबून असेल आणि त्यामध्ये जुलै महिन्यातील किरकोळ आणि घाऊक महागाईबरोबरच जून महिन्यातील आद्यौगिक उत्पादनाच्या आकडेवारीची महत्त्वपूर्ण भूमिका असेल, असेही ते म्हणाले.