आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जदारांना दिलासा नाहीच; प्रमुख व्याजदर 'जैसे थे', पतधोरण दरात बदल नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी चालू आर्थिक वर्षातील दुसरे द्वैमासिक पतधोरण जाहीर केले. राजन यांनी देशातील कर्जधारकांना कोणताही दिलासा दिलेला नाही. रेपो दर ६.५. टक्के, तर रिव्हर्स दर ६ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.

जागतिक स्तरावर मंदीचे सावट आहे. त्यात कच्च्या तेलाच्या दरात अनिश्चिततेबाबत राजन यांनी चिंता व्यक्त केली आहे. राजन यांनी भविष्यात महागाई वाढण्याचे संकेतही दिले आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजन यांनी सांगितले. मात्र, यंदा मान्सून समाधानकारक झाल्यास व्याजदरात कपात होण्याची शक्यताही राजन यांनी वर्तवली आहे. मान्सून चांगला राहिल्यास तसेच महागाई नियंत्रणात राहिल्यास ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर कपात करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत राजन यांनी दिले आहेत.

बाजाराने व्याजदरात कपात होणार नसल्याचा अंदाज आधीच लावला असल्याचे मत सॅमको सिक्युरिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिमित मोदी यांनी व्यक्त केले आहे. असे असले तरी मान्सूननंतर व्याजदरात कपात करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. या वेळी देशात चांगल्या पावसाची शक्यता असल्याने खाद्यान्नाच्या किमती कमी राहण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. असे झाल्यास महागाई दर कमी राहील. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत तसेच देशात सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचा रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या निर्णयावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

विकास दराचा अंदाज ७.६ %, महागाई ५ % राहण्याची अपेक्षा
* व्याजदराचा लाभ ग्राहकांना देण्याचे काम अपूर्ण : राजन
* मान्सून चांगला राहिल्यास पुढे व्याजदर कपातीची शक्यता
रिझर्व्ह बँकेचे सध्याचे दर
* रेपो दर ६.५० %
* रिव्हर्स रेपो दर ६ %
* मार्जिनल फॅसिलिटी ७ %
* सीआरआर ४ %
* एसएलआर २१.२५%
राजन यांच्यासमोर आहेत ही आव्हाने
* मान्सूनची स्थिती : देशात मान्सून कसा असेल यावर अनेक बाबी अवलंबून राहतील. हवामान विभागाने सामान्य पावसाची अपेक्षा व्यक्त केली अाहे. विशेषकरून कृषीवर त्याचा कसा परिणाम होणार आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
* कच्च्या तेलाच्या दराबाबत अनिश्चितता : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याचा सरळ परिणाम भारतीय आयातीवर होणार आहे. यामुळे महागाई वाढण्याचीही शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
* वाढती महागाई : एप्रिल महिन्यात जाहीर झालेल्या किरकोळ महागाई दरात वाढ झाली आहे. विशेषकरून भाज्या, डाळी, फळे, साखर आदींच्या किमती वाढल्या आहेत. येत्या काळात चांगला पाऊस पडला नाही तर महागाई दरात आणखी वाढ होण्याची शक्यता रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केली अाहे.
जागतिक बाजारातील अनिश्चितता
जगभरातील प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांत अनिश्चितता कायम आहे. जागतिक पातळीवर मागणी कमी असल्याचा परिणाम भारतीय उद्योगावर होत आहे. चीनमधील आर्थिक मंदी अद्याप संपलेली नाही. याव्यतिरिक्त इंग्लंड युरोपीय युनियनमधून बाहेर जातो का, याकडेदेखील लक्ष ठेवावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...