आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग क्षेत्राच्या ‘शस्त्रक्रिये’ची जबाबदारी डॉ. पटेलांच्या खांद्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गव्हर्नर रघुराम राजन यांना अनोखी भेट देऊन निरोप दिला. राजन यांचा निरोप समारंभ कायम आठवणीत राहण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात भव्य रांगोळी काढली. या रांगोळीमध्ये राजन यांच्या पाेर्टेटसोबतच १, रुपयांची नाणी, १०,२०,१००,५००,१००० रुपयांच्या नोटा रेखाटण्यात आल्या होत्या. यामध्ये “कभी अलविदा ना कहना’ तसेच सुस्वागतम असे संदेशही देण्यात आले होते. राजन यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी म्हणजे चार सप्टेंबर रोजीच या रांगोळीचे छायाचित्र उपलब्ध करून देण्यात आले होते.

ऊर्जित पटेल यांनी स्वीकारले २४ वे गव्हर्नर म्हणून पद
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा रघुराम राजन यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याबरोबरच एका विद्वान व्यक्तीला निरोप देण्यात आला. राजन “रॉकस्टार’ म्हणून ओळखले जात होते, तर नवे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी आतापर्यंत आपली प्रतिमा “लो-प्रोफाइल’ म्हणून कायम ठेवली आहे. महागाईचे कर्दनकाळ अशी ओळख असलेले पटेल आरबीआयचे २४ वे गव्हर्नर झाले आहेत. सोमवारी गणेश चतुर्थीची सुटी असल्यामुळे ते मंगळवारपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतील.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी असताना रघुराम राजन यांनी धोरणात्मक बाबींबरोबरच इतर अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत मांडले आहे. यामुळे ते अनेक वेळा वादात अडकले होते. ‘माझे नाव राजन आहे आणि मी तेच करतो, जे मला करायचे असते’ असे स्पष्ट करत देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावरही त्यांनी टीका केली होती. महाविद्यालयात इलेक्ट्रिकल अभियंता होण्यासाठी अर्थशास्त्र सोडणाऱ्या राजन यांना चाहत्यांनी रॉकस्टार राजन तसेच ‘बाँड ऑफ मिंट स्ट्रीट’ संबोधले, तर विरोधकांनी त्यांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

५३ वर्षीय राजन यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ रविवारी (४ सप्टेंबर) पूर्ण झाला. अलीकडच्या काळात कोणत्याही गव्हर्नरसाठी हा सर्वात छोटा कार्यकाळ ठरला आहे. काही अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही काळ आणखी हवा होता, असेही राजन यांनी सांगितले होते. याबाबतीत मात्र सरकारशी एकमत झाले नाही.

शिकागोला जाणार
राजन अध्ययन तसेच अध्यापन क्षेत्रात परतत आहेत. ते शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतील. तेथून सुटी घेऊन ते रिझर्व्ह बँकेत आले होते.

मोठे योगदान
जागतिक बाजारात अस्थिरता असताना राजन यांनी गव्हर्नरपद सांभाळले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्यामुळे त्या वेळी चिंता वाढली होती. आता स्थिती उत्तम आहे.
एनपीए कमी करण्याचे आव्हान
बँकांच्या अडकलेल्या कर्जाचा आकडा कमी करण्यासाठी पटेल यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. यामुळे गुंतवणुकीवर परिणाम होणार असल्याचे मत अनेक बँकांनी व्यक्त केले आहे.
अपूर्ण काम पूर्ण करण्याचा दबाव
राजन यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्याची जबाबदारी पटेल यांच्यावर आहे. बँकांची “शस्त्रक्रिया’ तसेच महागाईच्या विरोधातली लढाई जिंकणेदेखील महत्त्वाचे आहे.

अनुभवाची मदत
पटेल यांनी अनेक कॉर्पोरेट लीडर्स तसेच बँकर्ससोबत काम केलेले आहे.
बातम्या आणखी आहेत...