आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थ नियोजन: योग्य वेळी योग्य गुंतवा, निवृत्तीनंतर थाटात जगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या प्रत्येकाला कामातून निवृत्ती आज ना उद्या घ्यावीच लागेल. महिन्याच्या ठरलेल्या तारखेला बँक खात्यात पगार जमा होणे कधी तरी थांबणारच. असा दिवस उजाडेपर्यंत आपण वाट पाहत बसणार काय?
आपल्याला दरमहा काही तरी नियमित उत्पन्नाचा स्रोत शोधावाच लागेल. बहुताशांना आज नियमित निवृत्तीपश्चात वेतनाची (पेन्शनची) सुविधा अथवा सामाजिक सुरक्षा कवच प्राप्त नाही आणि ही वस्तुस्थितीच आहे. शिवाय आजकालचा विभक्त कुटुंबपद्धतीचा प्रघात पाहता, कमावत्या मुलाची सोबत असण्याची शक्यता कमीच. त्यामुळे वृद्धाश्रम जीवनात स्वावलंबन जपले जाईल, असा मार्ग शोधणे अपरिहार्यच आहे.
सुरुवात केव्हा करावी?
कोणतेही काम लवकर सुरू करा आणि आनंद मिळवा हा जीवनमंत्र गुंतवणुकीलाही लागू पडतो. उलट आपल्या निवृत्तीपश्चात जीवनासाठी तजवीज करणाऱ्या नियोजनाला आपण किती विलंबाने सुरुवात करीत आहोत, असा प्रश्न आपल्याला पडायला हवा. त्यामुळे नोकरीला सुरुवात करतेवेळीच या नियोजनासंबंधी विचारचक्र सुरू व्हायला हवे. कारण सोपे आहे. फारशा जबाबदाऱ्या नसलेल्या या वयात जितकी भविष्यासाठी बचत केली जाईल, तितके त्याचे पुढे अधिकाधिक फायदे मिळविता येतील. असे केल्याने दीर्घ मुदतीत चक्रवाढ गतीने गुंतवणुकीवर परताव्याचे लाभ पदरी पाडता येतील. बचत विरुद्ध खर्च यांचा ताळमेळ बसविणारा शिरस्ता फार लवकर अंगी बाणवला जाईल. त्यामुळे जितके लवकर शक्य आहे तितके खिशाला परवडेल इतक्या रकमेची गुंतवणूक सुरू करायला हवी. निवृत्तीपश्चात नियोजनात हा मिळकतीत खर्चाचा वाटा कमी असणारा म्हणजेच जमा वाढविण्याचा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. या काळात गुंतवणूक करून निवृत्तीसाठी पुंजी उभी करू शकतो. तुमचा मासिक खर्च भागवण्यासाठी केवळ व्याज लाभही पुरेसा ठरेल, इतकी ही पुंजी मोठी असायला हवी.
जमा कालावधीत नेमके काय करायचे?
निवृत्ती नियोजनातील हा महत्त्वाचा टप्पा आहे, तर जमा कालावधीत निवृत्तीसाठी पुंजी निर्माण हे नियमित गुंतवणूक शिरस्ता किंवा पद्धतशीर गुंतवणुकीच्या अर्थात एसआयपी मार्फत करता येईल. एसआयपीसह अधूनमधून एकरकमी मोठी गुंतवणूक (जसे इन्सेंटिव्ह, बोनस स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नाची) केली जायला हवी. शिवाय तुमचा पगार वर्षागणिक जसा वाढत जाईल, तसतशी मासिक एसआयपीची रक्कमही वाढवली पाहिजे.
सेवानिवृत्तीनंतर जीवनमानासाठी किती रक्कम लागेल आणि त्यासाठी आतापासून किती रक्कम गुंतवावी हे ठरविण्यासाठी आकडेमोड करणे आवश्यक ठरेल. त्यासाठीची पंचसूत्री :
1. तुमचा विद्यमान मासिक खर्च किती आहे, हे निश्चित करा
दिशादर्शन: निवृत्तीपश्चातही सुरू राहतील अशा खर्चाची प्राधान्याने गणती करा. जसे दरमहा किराणा व वाणसामानाचा खर्च, वेगवेगळी देयके (यातून मुलांच्या शाळा-कॉलेजची फी, गृहकर्जाचा हप्ता जे कालांतराने बंद होणार आहेत, ती वगळली पाहिजेत) वगैरे लक्षात घ्या.
2. सेवानिवृत्तीसाठी किती वर्षे शिल्लक राहिली आहेत?
दिशादर्शन: हा आकडा तुमचे सध्याचे वय आणि तुम्ही कोणत्या वर्षी सेवानिवृत्ती स्वीकारू इच्छिता यांची वजाबाकी करून ठरविता येईल.
3. खर्चाला महागाई दरात होणाऱ्या वाढीची जोड द्या
दिशादर्शन: खूप काटेकोरपणे नको, तर थोडे सैलपणे आकडेमोड करा.
4. जमा कालावधीत केलेल्या गुंतवणुकीवर परतावा किती मिळणे अपेक्षित आहे?
दिशादर्शन: या ठिकाणी मात्र काटेकोर गणित जुळवा. बहुतांश निवृत्तीसाठी तजवीज म्हणून होणारी गुंतवणूक ही स्थिर उत्पन्न देणाऱ्या पर्यायात आणि ज्यातून व्याज लाभ काढता येईल अशी असते. त्यामुळे परतावा नेमका किती मिळेल, याचा अंदाज बांधणे शक्य आहे.
5. आकस्मिक संभवणारे वैद्यकीय खर्च व आरोग्य गरजा लक्षात घ्या.
दिशादर्शन: तुमच्या दैनंदिन तब्येतीच्या काळजीसाठी, नियमित आरोग्य तपासणीसाठी खर्च म्हणून एक ठरावीक रक्कम निवृत्तीपश्चात येणाऱ्या खर्चाच्या नियोजनात जमेस धरावी.

गुंतवणूक करायची कुठे?
तुमची गुंतवणूक त्या काळातील महागाईदराला मात देऊ शकेल, हा पहिला निकष आहे. दीर्घ मुदतीत समभाग गुंतवणुकीने महागाई दराहून अधिक परतावा कायम दिला आहे. तरी सर्व रक्कम एकाच पर्यायात न गुंतविता, वैविध्य (डायव्हर्सिफिकेशन) जपावे.

एसआयपी नक्की काय आहे?
गुंतवणूक मूल्यात सरासरी साधली जाणे, वेळ साधण्याचे गणित जुळविण्याची गरज भासत नाही आणि गुंतवणुकीला चक्रवाढीचे बळ दिले जाते. अगदी सोपे करून सांगायचे झाल्यास, बाजारातील चढ-उतार तुमच्यासाठी धास्तीचे कारण न बनता उपयुक्त ठरतील.