आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपले घर सांभाळून ठेवा जगावर लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेची मध्यवर्ती बँक अर्थात फेडरल रिझर्व्हने व्याजदर २००८ च्या पातळीत जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. भारतीय बाजाराने फेडरलच्या या पावलाचे सकारात्मक स्वागत केले. शेअर बाजारातील तेजीत त्याचे प्रतिबिंब दिसले. फेडरलने व्याजदर जैसे ठेवण्याचा निर्णय घेताना जगातील काही प्रमुख अर्थव्यवस्थांच्या डळमळीत स्थितीकडे लक्ष वेधले. चीन, रशिया, ब्राझीलमधील अर्थचक्र सध्या मंदावलेले आहे. भारतीय गुंतवणूकदाराने याकडे लक्ष ठेवायलाच हवे. मात्र, असे करताना देशातील घडामोडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेअर बाजारात आता मोठ्या प्रमाणात अस्थैर्य राहील हे लक्षात घेऊन पावले टाकणे गरजेचे आहे.
विशिष्ट समभाग हेच लक्ष्य : दररोज सेन्सेक्स किती चढला-उतरला, निफ्टीत किती घसरण झाली वा तेजी आली याकडे फारसे लक्ष न देता गुंतवणूकदारांनी आता विशिष्ट (स्पेसिफिक) समभागांचे लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेचे आगामी पतधोरण, बिहारमधील निवडणुका, जीएसटीबाबत सरकारचे पाऊल, तेलाच्या किमती, महागाईची आकडेवारी आणि मोसमी पावसाचे वितरण या देशातील प्रमुख घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवावे. यावरच कोणत्या समभागात किती आणि केव्हा गुंतवणूक करायची हे गणित ठरवता येईल. त्यानुसार योग्य वेळी योग्य समभागात गुंतवणुकीचा निर्णय घेणे सुकर राहील.
भारतासाठी सकारात्मक : फेडरल रिझर्व्हेने व्याजदर वाढीचा निर्णय पुढे ढकलला हे भारताच्या दृष्टीने सध्या अत्यंत सकारात्मक ठरले आहे. शुक्रवारी निफ्टीने ८००० ही महत्त्वाची पातळी ओलांडली. निफ्टीत मोठ्या प्रमाणात तेजी आली. मात्र, नफेखोरीने ही तेजी बऱ्यापैकी मर्यादित राहिली. एफएमसीजी आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या समभागांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली. जगातील अनेक अर्थव्यवस्था किंवा एकूणच जागतिक अर्थक्षितिजावर काहीसे मळभ साचलेले आहे. तरीही भारतीय बाजाराचे सध्याचे चित्र पाहिले असता देशातील सकारात्मक पैलूंवर बाजार केंद्रित आहे. ही गुंतणूकदारांसाठी चांगली बाब आहे.
चीनची अर्थव्यवस्था डळमळीत झालेली असताना भारतात मात्र अर्थव्यवस्थेच्या बाबत चांगले चित्र आहे, असे मत फेडरल रिझर्व्हने व्यक्त केले आहे. फेडरल रिझर्व्हने विकसनशील देश तसेच चीनच्या अर्थव्यवस्थेबाबतचे चित्र लक्षात घेतले, असे प्रथमच घडले आहे. फेडरलच्या व्याजदर जैसे थे ठेवण्याच्या निर्णयाचा विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार आहे. जागतिक बाजारात कमोडिटीच्या किमतीत घसरण होत आहे. चीनची अर्थव्यऱ्स्था कोलमडते आहे. अशा वेळी भारतीय अर्थव्यवस्था बऱ्यापैकी स्थिर दिसते आहे.
घरातील घडामोडी : जगातील बड्या अर्थव्यवस्थांकडे लक्ष ठेवताना देशातील (घरातील) विविध घडामोडींवर बारकाईने नजर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक येत्या पंधरवड्यात आपले पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात केली तर औद्योगिक क्षेत्रासाठी ते लाभदायी ठरणार आहे. वस्तू व सेवा कराबाबत (जीएसटी) सरकार काय निर्णय घेते यावर पुढील बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत. बिहारच्या निवडणुकांत भाजपला विजय मिळाला तर बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे.