Home | Business | Share Market | Stock market on new hight

शेअर बाजार नव्या उच्चांकावर, सेन्सेक्स 33,940 पातळीवर बंद

वृत्तसंस्था | Update - Dec 23, 2017, 05:09 AM IST

ख्रिसमसच्या आधी भारतीय शेअर बाजार शुक्रवारी नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स १८४.०२ अंक

 • Stock market on new hight

  मुंबई- ख्रिसमसच्या आधी भारतीय शेअर बाजार शुक्रवारी नव्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स १८४.०२ अंक म्हणजेच ०.५५ टक्क्यांच्या वाढीसह ३३,९४०.३० या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ५२.७० अंक म्हणजेच ०.५० टक्क्यांच्या वाढीसह १०,४९३ या पातळीवर बंद झाला. याआधी १९ डिसेंबर रोजी सेन्सेक्स विक्रमी ३३,८३६.७४, तर निफ्टी १०,४६३.२० या पातळीवर बंद झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स ३३,९६४.२८ आणि निफ्टी १०,५०१.१० या पातळीपर्यंत गेला होता. भारतीय शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलायझेशन १५० लाख कोटी रुपयांच्या वर गेले आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयादेखील ६४.०५ या पातळीवर बंद झाला असून या महिन्यातील ही सर्वात मजबूत स्थिती आहे. ख्रिसमसमुळे सोमवारी बाजार बंद राहणार आहे. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत सेन्सेक्स ७,३०९.०७ अंक म्हणजेच २७.४५ टक्क्यांची वाढ मिळवली आहे.


  जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन विभागप्रमुख विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेमध्ये कर सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यामुळे तसेच सप्टेंबर तिमाहीमध्ये अमेरिकेतील विकास दर चांगला राहण्याची अपेक्षा वाढल्याने जगभरातील शेअर बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे. अमेरिकेतील जीडीपी विकास दर गेल्या तिमाहीमध्ये ३.२ टक्के होता. याव्यतिरिक्त कर दर कमी झाल्याने अमेरिकी कंपन्या गुंतवणूक वाढवण्याची शक्यता आहे. डिसेंबर तिमाहीमध्ये कंपन्यांची आकडेवारी सकारात्मक येण्याची अपेक्षा तसेच सकारात्मक अर्थसंकल्पाच्या शक्यतेने भारतीय शेअर बाजारात अतिरिक्त तेजी दिसून आली असल्याचे मत नायर यांनी व्यक्त केले. शेअर बाजारातील ही वाढ सलग तिसऱ्या आठवड्यात नोंदवण्यात आली आहे. या तीन आठवड्यात सेन्सेक्समध्ये ४७७.३३ अंक म्हणजेच १.४२ टक्के आणि निफ्टीमध्ये १५९.७५ अंक म्हणजेच १.५४ टक्क्यांची वाढ झाली आहे. मिडकॅप निर्देशांकात सलग सातव्या दिवशी आणि स्मॉलकॅप निर्देशांकात सलग सहाव्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली आहे. वर्षभरात निर्देशांकात २७.५% वाढ


  कंपन्यांनी जमवले ६२,७३६ कोटी
  चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान ११७ कंपन्यांनी आयपीओच्या माध्यमातून ६२,७३६ कोटी रुपये जमा केले. पाच वर्षांत आयपीओतून जमवलेल्या एकूण रकमेपेक्षाही ही रक्कम जास्त आहे. पाच वर्षांत कंपन्यांनी ६२,१४७ कोटी रुपये जमवले. अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी लोकसभेत ही माहिती दिली. आयपीओ आणणाऱ्या ११७ कंपन्यांमध्ये २८ मोठ्या आणि उर्वरित एसएमई कंपन्या होत्या.


  मार्केट कॅपमध्ये ६८,८७० कोटीची वाढ
  मुंबई शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये शुक्रवारी विक्रमी वाढ झाली. मार्केट कॅप पहिल्यांदाच १५ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. सेन्सेक्समध्ये ०.५५ % वाढीमुळे मार्केट कॅप १,५०,६७,२८५ या पातळीवर पोहोचला. यात गुरुवारच्या तुलनेत ६८,८६९.७१ कोटी रुपयांची वाढ झाली. मार्केट कॅप पहिल्यांदाच २८ नोव्हेंबर २०१४ रोजी १०० लाख कोटी रुपयांच्या वर गेला होता. मार्केट कॅपच्या दृष्टीने मुंबई शेअर बाजार जगातील १० वा मोठा बाजार आहे.


  तंत्रज्ञान क्षेत्रात मजबुती
  सेन्सेक्समध्ये ओएनजीसीत सर्वाधिक २.८७ टक्के आणि टीसीएसमध्ये १.७६ टक्क्यांची वाढ झाली. क्षेत्रनिहाय पाहिल्यास तंत्रज्ञान क्षेत्रातील निर्देशांकात सर्वाधिक १.०२ टक्क्यांची वाढ झाली.

Trending