नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची आर्थिक स्थिती कमकुवत होत आहे. चीनच्या आर्थिक मंदीचा परिणाम जगभरातील बाजारांवर दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात चीनमधील निर्यात ५.५ टक्क्यांनी घटली असली तरी हा आकडा अंदाजापेक्षा कमी आहे. आयातीमध्ये १३.८ टक्क्यांची मोठी घट मात्र चिंता वाढवत आहे. एका सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार आॅगस्टदरम्यान निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत ६ टक्के पडझड होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जुलैमध्ये चीनची निर्यात ८.३ टक्के घटली होती.
चीनची आयात सलग १० व्या महिन्यात कमी झाली आहे. आॅगस्टमध्ये चीनची आयात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १३.८ टक्के घटली आहे. या बाबत सर्वेक्षणात ८.२ टक्क्यांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जुलैमध्ये आयात ८.१ टक्के घटली होती. ही पडझड देशांतर्गत मागणीमध्ये घट झाल्याचे दर्शवते.
अवमूल्यनाने चिंता वाढली : अनेक अर्थतज्ज्ञांच्या मते, आॅगस्ट महिन्यात शेअर बाजारातील पडझड आणि युआन चलनाचे अवमूल्यन यामुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्ये चीनमधील स्थैर्य आणि धोरणांच्या बाबतीत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. येणार्या काळात आॅगस्टमधील आकडेवारीचा परिणाम चीनच्या अर्थव्यवस्थेवर दिसून येईल. ११ आॅगस्टला पीपल्स बँक ऑफ चायनाने युआनचे मूल्य २ टक्के कमी करून बाजारात भूकंप आणला होता. काही तज्ज्ञ यामुळे निर्यातीत वाढ होण्याची शक्यता वर्तवत असले तरी अनेकांच्या मते यामुळे बाजाराचे वातावरण खराब झाले आहे.
विकास दर ७ टक्के
नॅशनल डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म कमिशनच्या मते, चीनची अर्थव्यवस्था हळूहळू विकासाच्या दिशेने जात आहे. त्यामुळे चीन सरकार ७ टक्के विकास दर मिळवण्यात यशस्वी होईल. सरकार यासाठी अनेक चांगल्या योजना आखत आहे. ज्यामध्ये गव्हर्नमेंट डेट स्वॅप, रेट कट आणि रियल इस्टेट मार्केट स्टीम्युलस यांसारख्या योजनांचा समावेश आहे.