आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वित्त वर्षाचा प्रारंभ तेजीने सेन्सेक्सची त्रिशतकी वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सरत्या आर्थिक वर्षात २५ टक्के परतावा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकणाऱ्या शेअर बाजारात नव्या वर्षाचा प्रारंभ तेजीने झाला. बुधवारी सेन्सेक्स ३०२.६५ अंकांनी वाढून २८,२६०.१४ या पातळीवर बंद झाला.
निफ्टी ९५.२५ अंकांनी वधारून ८,५८६.२५ झाला. बँका व आरोग्य क्षेत्रातील समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेल स्वस्त केल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. बाजाराला गुरुवार आणि शुक्रवारी सुटी आहे. या आठवड्यात सेन्सेक्सने ३ टक्के वाढ नोंदवली.
ब्रोकर्सनी सांगितले, आर्थिक वर्षाचा प्रारंभ सकारात्मक झाला. तेल कंपन्यांनी इंधनाच्या किमतीत कपात केली. तसेच सरकारने वित्तीय तूट कमी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. त्यामुळे बाजारात खरेदीला वेग आला. बँका, आरोग्य, एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाली. किरकोळ गुंतवणूकदारांच्या स्मॉल व मिड कॅप कंपन्यांच्या समभागांवर उड्या पडल्या. त्यामुळे स्मॉल कॅप निर्देशांक २.३५ टक्क्यांनी तर मिड कॅप निर्देशांक १.४९ टक्क्यांनी वधारले. युरोपातील प्रमुख बाजारात तेजीचे तर आशियातील प्रमुख बाजारात संमिश्र वातावरण होते. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी सात समभाग घसरले तर २३ वधारले.

सोन ,चांदी वधारले

दोन दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी सराफ्यात तेजी परतली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे २०० रुपयांनी वाढून २६,७७५ झाले. चांदी किलोमागे १५० रुपयांनी चकाकून ३७,३५० झाली. ज्वेलर्सकडून चांगली मागणी आल्याने सोने चकाकल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. सिंगापूर सराफ्यात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.५ टक्क्यांनी वाढून १,१८९.१५ डॉलर झाले.

बाजार आता सोमवारी उघडणार

गुरुवारी (२ एप्रिल) महावीर जयंतीनिमित्त, तर शुक्रवारी (३ एप्रिल) गुड फ्रायडेनिमित्त मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराला सुटी आहे. त्यामुळे आता सोमवारी, ६ एप्रिल रोजी बाजारात व्यवहार होतील.
तेजीचे मानकरी

सन फार्मा, टाटा मोटर्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, टाटा स्टील, आयटीसी, भारती एअरटेल.