आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सचा तीन आठवड्यांचा उच्चांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शेअर बाजाराने बुधवारी सलग चौथ्या सत्रात तेजीचा चौकार ठोकला. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली जाेरदार खरेदी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस व कोल इंडिया समभागांवर पडलेल्या उड्या यामुळे सेन्सेक्ससह निफ्टी वधारले. सेन्सेक्स १९१.१६ अंकांच्या वाढीसह २८,७०७.७५ वर बंद झाला, तर निफ्टीने ५४.१० अंकांच्या उसळीसह ८,७२३.३० ही पातळी गाठली. सेन्सेक्स व निफ्टीचा हा तीन आठवड्यांचा उच्चांक आहे.

ब्रोकर्सनी सांगितले, शेअर बाजारात बुधवारी दिग्गज समभागांची खरेदी झाली. विदेशी गुंतवणूकदारांनीही निवडक समभागांच्या खरेदीवर जोर दिला. त्यामुळे दोन्ही निर्देशांक वधारले. असे असले तरी व्याजदराशी संवेदनशील समभाग, तसेच रिअ‍ॅल्टी व भांडवली वस्तू कंपन्यांच्या समभागांचा या तेजीत सहभाग दिसला नाही. आशियातील प्रमुख बाजारात तसेच युरोपातील बाजारात संमिश्र कल दिसला. चीन, हाँगकाँग, जपान आणि दक्षिण कोरियाच्या बाजारात वाढ, तर सिंगापूर व तैवान बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २१ समभाग वधारले, तर नऊ घसरले.
स्मॉल-मिड कॅपला पुन्हा मागणी : स्मॉल व मिड कॅप कंपन्यांच्या समभागांकडे गुंतवणूकदार पुन्हा वळाले आहेत. बुधवारी स्मॉल कॅप निर्देशांक १.७९ टक्क्यांनी आणि मिड कॅप निर्देशांक ०.६५ टक्क्यांनी वधारले. बँकेक्स मात्र घसरला.