आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परताव्यात सरस कोण, शेअर बाजार की म्युच्युअल फंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या अभ्यासाअभावी, अति लोभीपणा (ग्रीड), संयम नसल्यामुळे, शेअर बाजारात नुकसान करून घेतात हे वास्तव आहे. परंतु म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हीदेखील जोखमीची असली तरी दीर्घकालीन गुंतवणूक, त्यातही एसआयपीद्वारे केली तर कदाचित या धोक्याची तीव्रता कमी होऊ शकते.
लक्ष्मीकांत कोरडे, गुंतवणूक सल्लागार,औरंगाबाद
प्रत्येकाच्या जीवनात गुंतवणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजारात गुंतवणुकीची अनेक साधने उपलब्ध आहेत. जसे, शेअर बाजार, म्युच्युअल फंड, बँक मुदत ठेवी, विविध बचत प्रमाणपत्रे, रोखे, रिअल इस्टेट आदी. काही साधने जोखीमयुक्त आहेत. काही कमी परतावा देणारी आहेत, तर काही साधनांत गुंतवणूक करण्यासाठी तांत्रिक ज्ञान, त्या क्षेत्राची माहिती असणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा नेमके कोणते साधन निवडावे, असा प्रश्न गुंतवणूकदाराला सतावत असतो. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या दोन साधनांबाबत असाच प्रश्न गुंतवणूकदाराला पडतो. त्यामुळे प्रत्यक्ष शेअर बाजारातली गुंतवणूक आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक यात सरस कोण, हे उमगल्यास हा प्रश्न सुटू शकतो. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड तसेच इतर साधने यातून मिळणारा परतावा कसा आहे हे समजून घेतल्यास हे कोडे सुटण्यास चांगली मदत होईल.

शेअर बाजारात स्वतः केलेली गुंतवणूक ( direct Investment ) आणि म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात केलेली गुंतवणूक ( Indirect Investment ) यामधला फरक समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. समजा आपल्याला औरंगाबादहून पुण्याला जावयाचे आहे, तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय स्वतःच्या कारने स्वतः गाडी चालवत जाणे. यात तुम्हाला गाडी चालवण्याचा आनंद मिळतो. प्रवासाचा वेळ, वेग, मार्ग या गोष्टींचे नियंत्रण तुमच्या हातात असते. दोन दिवसांत पुण्याला पोहोचायचे की ३ तासांत हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून असते. पण यासाठी तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे, तुम्हाला ड्रायव्हिंगचे नियम माहिती असले पाहिजेत. तुमच्या गाडीत पुरेसे पेट्रोल असले पाहिजे ( थोडक्यात पुरेसे भांडवल पाहिजे). हा झाला शेअर बाजारातील प्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग. यामध्ये तुम्हाला शेअर बाजाराच्या कार्यपद्धतीविषयीचे संपूर्ण ज्ञान पाहिजे. पुरेसे भांडवल पाहिजे. संपूर्ण वेळ बाजाराच्या अभ्यासासाठी तुम्हाला देता आला पाहिजे. थोडक्यात, ही प्रक्रिया खर्चिक आहे.

दुसरा पर्याय आहे शिवनेरीने पुण्याला जाणे. या पर्यायात वेळ आणि वेगावर तुमचे नियंत्रण नाही. पण कमी खर्चात, आरामात एसी गाडीने तुम्ही जाऊ शकता. ड्रायव्हिंग करण्याची गरज नाही. गाडी चालू असताना आरामात पेपर वाचू शकता. हा झाला म्युच्युअल फंडाद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा मार्ग. यामध्ये तुम्हाला स्वतःला पैसा गुंतवणे आणि म्युच्युअल फंडाची स्कीम समजावून घेणे याव्यतिरिक्त रोज उठून फारसे काही करायची गरज भासत नाही.

तुमचा फंड व्यवस्थापक ठरलेल्या स्कीमनुसार फंडाचे (पैशाचे )अलोकेशन आणि तुमचा पोर्टफोलिओचे व्यवस्थापन करतो. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्ही दरमहा १००० रुपयांच्या एसआयपीनेही करू शकता. पण शेअर बाजारात प्रत्यक्ष गुंतवणुकीसाठी निश्चितच यापेक्षा जास्त भांडवलाची गरज असते. या दोन्ही प्रकारच्या गुंतवणुका जोखमीच्या आहेत. (risky asset). आता - प्रत्यक्ष शेअर बाजारातली गुंतवणूक आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक यापैकी कोणती जास्त फायद्याची आहे हे सांगणे अवघड आहे.
कारण शेअर बाजारातील घडामोडींचा सखोल अभ्यास असणाऱ्या व्यक्तीला शेअर बाजारातील गुंतवणूक ( direct investment ) कदाचित जास्त फायदा मिळवून देईल. परंतु बहुतांश गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या अभ्यासाअभावी, अति लोभीपणा (ग्रीड), संयम नसल्यामुळे, शेअर बाजारात नुकसान करून घेतात हे वास्तव आहे. परंतु म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हीदेखील जोखमीची असली तरी दीर्घकालीन गुंतवणूक, त्यातही एसआयपीद्वारे केली तर कदाचित या धोक्याची तीव्रता कमी होऊ शकते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, विविध साधणांतील उत्पन्न...