Home | Business | Share Market | demonetization country's currency shortage: Governor Urjit Patel

नोटाबंदीनंतर देशातील चलन तुटवडा लवकरच संपेल : गव्हर्नर ऊर्जित पटेल

वृत्तसंस्था | Update - Jan 21, 2017, 03:05 AM IST

नोटाबंदीनंतर देशात आलेला चलन तुटवडा लवकरच सामान्य होणार असल्याचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी केला आहे

 • demonetization country's currency shortage: Governor Urjit Patel
  नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशात आलेला चलन तुटवडा लवकरच सामान्य होणार असल्याचा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी केला आहे. शुक्रवारी पटेल यांनी लोकलेखा समितीसमोर (पीएसी) हा दावा केला आहे. स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष करून ग्रामीण क्षेत्रासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी समितीच्या सदस्यांना सांगितले.
  आर्थिक इंटेलिजन्स युनिट आणि प्राप्तिकर विभाग अनियमित पैसे जमा झालेल्या खात्यांचा तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. नोटाबंदीनंतर बाजारातील चलन तुटवडा शहरी भागात जवळजवळ संपत आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
  ऑनलाइन व्यवहारावरील शुल्क कमी करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँकेच्या वतीने करण्यात येत असल्याचेही पटेल यांनी सांगितले. या समितीसमोर त्यांना पतधोरणासंदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले. सध्या शहरी आणि ग्रामीण भागात नगदी चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.
  या दरम्यान समितीतील भाजप सदस्यांनी नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल पटेल यांचे आभार मानले. मात्र, त्याच वेळी आभारच मानायचे असेल तर आम्हाला कशासाठी आमंत्रण दिले, असा आरोप करत विरोधकांनी विरोध केला. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल आणि डिप्टी गव्हर्नर आर. गांधी या दोघांनाही समितीच्या सदस्यांनी अनेक प्रश्न विचारले. तसेच या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी त्यांना १५ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
  नोटाबंदीच्या निर्णयाबाबत सरकार तसेच रिझर्व्ह बँक यांच्या जानेवारी २०१६ पासूनच चर्चा सुरू होती, असेही रिझर्व्ह बँकेच्या वतीने समितीसमोर स्पष्ट करण्यात आले आहे.
  डिजिटलला प्रोत्साहन
  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी नोटाबंदीचे समर्थन करत समितीच्या सदस्यांना याच्या परिणामांविषयी माहिती दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सरकारच्या निर्देशानुसार रिझर्व्ह बँक डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
  नोटाबंदीनंतर देशात सध्या चलनाचा तुटवडा कमी झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात असलेल्या तुटवड्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल तसेच या परिसरातही चलनाचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
  नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेवर तत्काळ परिणाम झाला असला तरी पुढील काळात यामुळे अर्थव्यवस्थेला मदत मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Trending