नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोने १४० रुपये स्वस्त झाले. दिल्लीत सोने २६,७०० रुपये प्रतितोळ्याच्या भावाने विक्री झाले, तर चांदीमध्येदेखील ५० रुपयांची घट झाली असून चांदी ३५,२०० रुपये प्रति किलोग्रॅमने विक्री झाली. जागतिक बाजारात सोन्यामध्ये ०.०२ टक्के कमजोरी आली असून १११८.९ डॉलर प्रतितोळ्यावर भाव आले आहेत. बाजारातील तज्ज्ञांच्या मते अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याबाबत कायमच अनिश्चितता दिसून येत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. फेडरल रिझर्व्ह बँकेची आढवा बैठक १६ आणि १७ सप्टेंबरला होणार आहे.
त्या बैठकीनंतरच सोन्यामध्ये मोठी वाढ किंवा मोठी घट होण्याची शक्यता असल्याचेदेखील तज्ज्ञांनी सांगितले. मंगळवारी मुंबई सराफा बाजारात सोने २६,४४५ रुपये प्रति तोळ्याने विक्री झाले, जे साेमवारी २६,५६५ रुपये प्रति तोळ्याने विक्री झाले होते. तर सोमवारी ३५,५९५ रुपये प्रतिकिलोग्रॅमने विक्री झालेली चांदी मंगळवारी मात्र ३५,७३५ रुपये प्रतिकिलोग्रॅमने विक्री झाली.