नवी दिल्ली, मुंबई - जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेत व देशातील ज्वेलर्स, रिटेलर्सकडून घटलेली मागणी याचा दबाव बुधवारी सोन्याच्या किमतीवर दिसून आला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ८० रुपयांनी घसरून २७,१५० झाले. चांदी मात्र किलोमागे ३८ हजार रुपयांवर स्थिर राहिली. तिकडे विदेशी मुद्राविनिमय बाजारात रुपयाचे मूल्य वधारले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने दोन पैशाची कमाई करत ६२.२४ पर्यंत मजल मारली.
सराफा व्यापार्यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारात सोन्यासाठी अनुकूल वातावरण नव्हते. त्यातच देशातील ज्वेलर्स व रिटेलर्सकडून मागणी नसल्याने सोन्याच्या किमतीवर दबाव आला. न्यूयॉर्क सराफा बाजारात सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.५२ टक्क्यांनी घटून १२०७.७० डॉलरवर आले. मागणी कायम राहिल्याने चांदी स्थिर राहिली.