नवी दिल्ली - अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या वतीने व्याजदरात वाढ करण्याच्या वृत्तामुळे सोने तसेच चांदीच्या किमतीत जोरदार घसरण नोंदवण्यात आली. भारतीय सराफा बाजारात सोने ७३० रुपयांच्या घसरणीसह ३०५२० रुपये प्रती दहा ग्रॅमच्या दरावर आले. एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत झालेली ही या वर्षातील सर्वात मोठी घसरण आहे. चांदीचे दरदेखील १७५० रुपयांच्या घसरणीसह ४३,२५० रुपये प्रतिकिलोवर आले. भारतीय सराफा बाजाराचा विचार केल्यास गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वात नीचांकी पातळी आहे.
अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षा जेफरी लेकर यांनी मंगळवारी डिसेंबर महिन्यात व्याजदरात वाढ होण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले. यामुळे जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री झाली. अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत असल्याचे दिसत असून यामुळे डिसेंबर महिन्यात फेडरल व्याजदरात वाढ करणार असल्याचे मानले जात आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी कमी झाली आहे. बुधवारी डॉलरचा निर्देशांकदेखील ०.४९ टक्क्यांनी वाढून ९६.१७ च्या पातळीवर पोहोचला आहे. डॉलर मजबूत झाल्यानेदेखील सोन्याच्या किमतीत घसरण दिसून आली आहे. भारतीय बाजारातील मागणी कमी झाल्यामुळेदेखील सोने तसेच चांदीच्या किमती घसरल्या आहेत.
सोन्याची नाणी झाली स्वस्त
दिल्ली सराफा बाजारात सोने तसेच चांदीच्या घसरणीसह सोन्याच्या नाण्याच्या किमतीतही घसरण झाली. सोन्याचे नाणे (८ ग्रॅम प्रती) १५० रुपयांनी स्वस्त होऊन २४,३५० रुपयांवर आले.
सोने येणार २७ हजारांवर
ब्रेक्झिट तसेच कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये तेजी आल्यामुळे गेल्या काही दिवसांत सोने तसेच चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली होती. मात्र, आता पुढील काळात सोने २७ ते २८ हजार रुपये प्रती दहा ग्रॅमच्या पातळीवर येण्याची शक्यता असल्याचे मत दरिबा ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष तरुण गुप्ता यांनी सांगितले. सोन्याच्या किमतीत घसरण झाल्यास दिवाळीच्या काळात सोने खरेदीत मोठी वाढ नोंदवली जाऊ शकते.