आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Guarantee Rate: The Government Ordered The Purchase Centers Offer Two Thousand Price Starts Falling Supply About New Arrivals

हमी भाव : खरेदी केंद्रांसाठी सरकारने मागवले प्रस्ताव नव्या तुरीची आवक सुरू होताच दरात दोन हजारांची घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर : बाजारात नवीन तुरीची आवक सुरू होताच दरात दोन हजारांची घसरण झाल्याने सरकारने आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले असून, ती लवकरच कार्यान्वित होणार आहेत. मागच्या काळात तूरडाळीचा भाव दोनशे रुपयांपर्यंत गेल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत हाहाकार उडाला होता. त्यामुळे सरकारने यंदा वेळीच पावले उचलली आहेत.
लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटकातून नवीन तूर विक्रीला येत आहे. बुधवारी दोन हजार क्विंटल नव्या तुरीची आवक झाली होती. तिला कमाल ५५००, तर किमान ५२०० प्रतिक्विंटल भाव मिळाला.
यंदा जोरदार पाऊस झाल्याने आणि रोगराईचा प्रादुर्भाव टळल्याने तुरीचे बंपर उत्पादन निघणार आहे. परंतु चांगल्या उत्पादनाची चाहूल लागताच तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी नेहमीप्रमाणे निराशाच येण्याची शक्यता आहे.
गेल्या एप्रिल, मे महिन्यात तुरीचे भाव ९५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेले होते. त्यानंतर चांगला पाऊस सुरू झाला आणि दरात घसरण होत दीड महिन्यापूर्वी तुरीचा भाव ७२०० रुपयांवर आला. आता नवीन तुरीची आवक सुरू होताच त्यात दोन हजारांची घट होऊन भाव ५२०० पर्यंत खाली घसरले आहेत. हंगामाच्या सुरुवातीलाच भाव पडल्याने काही दिवसांत तूर ४५०० रुपयांवर येणार असल्याचा अंदाज येथील व्यापाऱ्यांनी बांधला आहे.
राज्यात सर्वाधिक मागणी तुरीच्या डाळीला असते. त्यामुळे तूरडाळीची साठेबाजी होऊन भाव २०० रुपये प्रति किलोपर्यंत गेले होते. दोन वर्षांपूर्वी तूरडाळी वरून हाहाकार उडाल्याने राज्य सरकारने तूर लागवड क्षेत्रात वाढ, उत्पादकता वाढवण्यासाठी २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये संकरित तूर उत्पादन प्रोत्साहन कार्यक्रम राबवला होता. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, यंदा महाराष्ट्रात तुरीच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे.

मराठवाड्यात प्रमुख पीक
देशात प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात तुरीचे उत्पादन घेतले जाते. राज्याचा देशातील तुरीच्या क्षेत्रात २९ टक्के वाटा असून उत्पादनात २६ टक्के वाटा आहे. महाराष्ट्रात अमरावती विभागात ४०, तर औरंगाबाद विभागात ३७ टक्के तुरीचे उत्पादन घेतले जाते.
पाच हजारांचा हमी भाव
- बाजारातील हालचाली पाहता सरकारने तुरीचा भाव पाच हजारांच्या खाली येऊ नये म्हणून तयारी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात लातूर, चाकूर, उदगीर व औसा येथे आधारभूत किमतीनुसार खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार लवकरच ही केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. सरकारने तुरीला ५०५० रुपयांचा हमी भाव जाहीर केला आहे.
यादव सुमठाणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, लातूर
बातम्या आणखी आहेत...