आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असाही भूकंप ...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपत्ती हीच एक संधी, म्हणण्यापुरतं छान आहे; पण आपत्ती ज्यांच्यावर ओढवली, त्यालाच विचारावं याबद्दल. नुकताच २५ एप्रिल रोजी शाहू मोडक स्मृतिदिनाप्रीत्यर्थ पुणे येथे बालगंधर्वला एक अतिशय देखणा सोहळा पार पडला. प्रतिभाताई मोडक यांच्या प्रेमाखातर मी पण कार्यक्रमाला गेले होते. संपूर्ण दिवस पुण्यात प्रचंड धावपळीत गेला. खूप चांगली माणसं जोडली गेली. रात्री उशिरा पुण्याहून परतले.

दुसऱ्या दिवशी रविवार. खूप काही छान-छान वाचायचं, म्हणून सगळे पेपर पुढ्यात घेऊन बसले. हेडलाइन वाचली. म्हणलं, जुना पेपर आहे की काय? पण सगळाच पेपर ताजा होता. पण टवटवीत नव्हता.
नेपाळला बसलेल्या प्रचंड भूकंप धक्क्याबद्दल सर्वच पेपरांनी सविस्तर बातम्या दिल्या होत्या. सुन्न होणं हीच स्थिती होती त्या क्षणाची.
भारतासहित सर्वांनीच मदतीचे हात पुढे केले. करायलाच हवेत. ज्या जवानांनी, व्यक्तींनी प्रत्यक्ष मदत केली, त्यांना सलाम! पण जे स्वत:च्या अपुऱ्या स्वप्नासहित संपले, त्यांच्यासाठी आतडं तुटण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. जे गेले त्यांच्या आप्तजनांचं सांत्वन करण्याचं सामर्थ्य कोणत्याच शब्दांत नाही.
वर वर जरी ही नैसर्गिक आपत्ती वाटत असली, तरी खरंच ही नैसर्गिक आपत्ती होती का?
खरं तर हळूहळू आपण सर्व जण आपल्याच हातांनी हा ऱ्हास ओढवून घेत आहोत. आपल्याला इतिहासाशी देणं-घेणं नाही. भौगोलिक परिस्थितीशी आपला काही संबंधच नाही, असं वावरणं आहे, सर्वांचं.
आज आपली जी जीवनपद्धती आहे, ती निसर्गाला त्रास देणारीच आहे. जो निसर्ग तुम्हाला भरभरून देण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याच जिवावर आम्ही उठलो. मग तोही त्याची ताकद अशा प्रकारे दाखवून देतो. खरं पाहता, निसर्गाला शरण जाऊन जे-जे करता येईल, ते-ते करावं. पण आपण आपल्या गरजा अवास्तव वाढवल्या. त्यासाठी निसर्गातल्या प्रत्येक देण्याला वेठीला धरले.
तो देतोय. पण आपल्याला त्याच्या इलाजाने, प्रकृतीने काही घ्यायचं नाही. ओरबाडणं हेच आजचं तत्त्व होऊ पाहतंय, हे थांबायलाच हवं.
असे सर्वस्व उद‌्ध्वस्त करणारे भूकंप ‘पालवीला’ अधूनमधून अनुभवावेच लागतात.
या कामातला तो अपरिहार्य भाग आहे.
एक-एक जीव ‘पालवीला’ लळा लावतो. पालवी त्याची व तो जीव सर्वस्वाने पालवीचा होतो. दिसामाजी स्वप्नं डोलत असतात. वास्तवाचे कंगोरे अधूनमधून घासतात. पण चालायचंच, म्हणून पुढे पुढे वाटचाल चालू असते आणि‍ अचानक ध्यानीमनी नसताना काही तरी निमित्त पुरतं; मृत्यू सावज टिपतो. जाता जीव जातो. मागे राहणाऱ्यांची, आमच्यासारख्यांची मग तडफड व फडफड चालू होते. प्रा. दवणे सरांचे वाक्य तापत्या लाव्हारसासारखे परत परत कानात उतरत राहते.
‘एचआयव्ही व एड्सग्रस्त बालकांचा सांभाळ म्हणजे मृत्यूची पालखीच तुम्ही खांद्यावर घेऊन निघालात की.’ आता ही पालखी उतरावी वाटते आहे. खांदा दुखावलाय.
मनालाही उसण भरलीय. ही सगळी बालकं हसत-खेळत पुढ्यात असतात, तेव्हा परमेश्वराचे उपकार वाटतात, की खूप चांगलं काम त्याने हाती दिलं आहे म्हणून.
पण मृत्यूचा जबरदस्त तडाखा बसतो. होत्याचे नव्हते होते. काल-परवापर्यंत घरभर व अंगणात चिवचिवणारी भिरभिरणारी ही चिमणपाखरं, चिमणीनं ज्या सहजतेनं तांदळाचा दाणा टिपावा तसा ‘घास’ या बालकांचा घेतला जातो. तेव्हा परमेश्वराला विचारावं वाटतं व विनवावं वाटतं, अजून दोन-चार क्षण त्यांच्या व आमच्या आयुष्यात आनंदाचे टाकले असतेस. अजून थोडं श्वासाचं देणं दिलं असतंस तर काय बिघडलं असतं? माझाच नाही तर आम्हा सर्वांचाच पुनर्जन्मावर विश्वास आहे.
या प्रत्येक जिवाला पुढच्या जन्मात संपूर्ण निरोगी आयुष्य तर लाभणारच; पण माझं हे एकच स्वप्न याच्या पुढच्या जन्मी पूर्ण होऊ दे. होणारच.
यांच्या डाव्या-उजव्या हाताला लाड करणारे, काळजी करणारे व हट्ट पुरवणारे आई-बाबा असू दे. शाळेला जाताना आईने पोळी-भाजी बरोबर थोडं प्रेम डब्यात भरून देऊ दे.
कॉलेज जीवनात प्रवेश करताना त्याचा बाबा त्याच्या बरोबर असू दे. रोज रात्री याची आई-बाबांसमवेत अंगत-पंगत होऊ दे. घराच्या चार भिंतींचा सुखद गारवा, सुरक्षा याला मिळू दे. ‘सर्वे भवंतु सुखीन:’
dimple@palawi.org