आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमजोरी : मे 2014 नंतर पहिल्यांदाच सेन्सेक्स 24000 च्या खाली बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - युरोपीय सेंट्रल बँकेच्या महत्त्वपूर्ण बैठकीआधी अमेरिकी आणि युरोपीय बाजारात आलेल्या कमजोरीमुळे देशातील शेअर बाजारात ०.४५ टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १४ मे २०१४ नंतर पहिल्यांदाच २४,००० च्या खाली बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ३२ अंकांच्या घसरणीसह ७२७६ च्या पातळीवर
बंद झाला.

आशियाई बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे देशातील शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या निशाणावर झाली. मात्र, दुपारच्या सत्रात जपान आणि चीनच्या बाजारातून घसरणीचे संकेत मिळाल्यामुळे अचानक बाजार २०० अंकांनी घसरला. वास्तविक, युराेपीय बाजारात सुधारणा झाल्यामुळे बाजार बंद होता होता सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये थोडीफार रिकव्हरी
दिसून आली.

सेन्सेक्स दिवसभरात ४९० अंकांच्या मर्यादेत व्यवहार करताना दिसला. सेन्सक्सने २४४५१.८३ ची सर्वोच्च पातळी, तर २३८६२.०० ची नीचांकी पातळी गाठली होती. राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टीमध्ये समावेश असलेल्या ५० मधील २९ स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली, तर २१ स्टॉक्समध्ये खरेदी दिसून अाली. अॅक्सिस बॅक, अल्ट्राटेक, अंबुजा सिमेंट्स, बँक ऑफ बडोदा आणि टाटा स्टील १.७७ टक्क्यापासून ते ५.५२ टक्क्यांची तेजी राहिली. तर टाटा मोटार्स, मारुती, डॉ. रेड्डीज, ओएनजीसी आणि कोल इंडियामध्ये चार टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. मागणी वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किमतीत २१० रुपयांची वाढ झाली असून सोने २६,९०० रुपये प्रती तोळ्यावर पोहोचले.
फार्मा आणि ऑटो क्षेत्रात जास्त पडझड
फार्मा, ऑटो, एनर्जी, एफएमसीजी, मेटल आणि इन्फ्रा स्टॉक्समध्ये विक्रीमुळे दबाव दिसून आला. निफ्टीमध्ये फार्मा इंडेक्स २.३ टक्के, ऑटो इंडेक्स ०.९ टक्के, एनर्जी इंडेक्समध्ये १.६ टक्क्याची घसरण नोंदवण्यात आली.
रुपयाची घसरण; महागाई वाढणार
डॉलरच्या तुलनेत रुपया ६८ च्या पातळीवर गेल्यामुळे फक्त डाळी आणि खाद्यतेलाच्याच नाही, तर एलईडी, एसी, वॉशिंग मशीनपासून विदेशात शिक्षण घेणेदेखील महागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रुपयातील कमजोरी कायम राहिल्यास स्वस्त कर्जालादेखील झटका बसण्याची शक्यता आहे. आधीच डाळीच्या किमती १९० ते २०० रुपये किलोपर्यंत गेल्या असून रुपयाच्या किमतीमुळे यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.