आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारावर पुन्हा दबाव; सेन्सेक्स 143 अंकांनी घसरला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारात मंदी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने सुरुवातीच्या वाढीनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १४३ अंकांनी घसरून २४,६८२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ५४ अंकांच्या घसरणीसह ७५१० च्या पातळीवर बंद झाला.

शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात छोट्या आणि मोठ्या सर्वच शेअरमध्ये दबाव दिसून आला. बीएसई १०० इंडेक्स ०.७३ टक्के, तर बीएसई २०० इंडेक्स ०.७४ टक्के पडून घसरणीसह बंद झाले. तर मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप इंडेक्स ०.९४ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. मिडकॅप इंडेक्समध्ये समावेश असलेल्या इंडियन बँकेमध्ये ५ टक्के, जिंदल स्टीलमध्ये ४.७ टक्के, रिलायन्स कम्युनिकेशनमध्ये ४.४ टक्के तसेच आयडीबीआयमध्ये चार टक्क्यांची घसरण दिसून आली. स्मॉलकॅप इंडेक्समध्ये मंगळवारी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण दिसून आली. स्मॉलकॅप इंडेक्समध्ये समावेश असलेला फेडरल बँक ८.४१ टक्क्यांनी घसरला.

मंगळवारी सर्वात जास्त घसरण बँिकंग क्षेत्रात दिसून आली. यामध्ये सरकारी बँकांच्या शेअरमध्ये सर्वात जास्त नुकसान झाले. राष्ट्रीय शेअर बाजारात सर्वात जास्त २.५७ टक्क्यांची घसरण झाली. इंडेक्समध्ये समावेश असलेले सर्व १२ शेअर घसरणीसह बंद झाले. सिंडिकेट बँक आणि ओबीसी शेअर चार टक्क्यांपेक्षा जास्तीच्या घसरणीसह बंद झाले. तसेच ऑटो क्षेत्रातील इंडेक्स ०.३९ टक्के घसरणीसह बंद झाले, तर मेटल क्षेत्रातील इंडेक्समध्ये मंगळवारी १.२ टक्क्यांची घसरण झाली.
घसरणीची कारणे
- कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येण्याची शक्यता वाढली.
- जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सल्ला आरबीएसने दिला.
- आयआयपीची आकडेवारी जाहीर होण्याआधीच गुंतवणूकदारांनी बाजारापासून दूर राहणे पसंत केले.
- जाहीर आकडेवारीनुसार बँकिंग क्षेत्रातील स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.