Home | Business | Share Market | news about increase in sensex

भाजप विजयाचे स्वागत; सेन्सेक्सची जोरदार उसळी, 496 अंकांची वाढ

वृत्तसंस्था | Update - Mar 15, 2017, 03:05 AM IST

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळाल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.

 • news about increase in sensex
  मुंबई- देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळाल्यामुळे त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला सेन्सेक्स ४९६ अंकांच्या वाढीसह २९,४४३ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी १५२ अंकांच्या वाढीसह ९,०८७ या पातळीवर बंद झाला. भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात निफ्टी पहिल्यांदाच ९००० या पातळीवर बंद होण्यात यशस्वी झाला. निफ्टी-५० मध्ये समावेश असलेल्या ५१ शेअरपैकी ४४ शेअर हिरव्या निशाणीवर तर ७ शेअर घसरणीसह बंद झाले.

  भारतीय गुंतवणूकदारांनी भाजपच्या विजयाचा जल्लोष साजरा केल्यामुळे पहिल्यांदाच निफ्टी ९००० या पातळीच्या वर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान निफ्टीने ९१२२.७५ ही पातळी गाठली होती. याप्रमाणे एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. असे असले तरी वरच्या पातळीवर बाजारात नफारूपी विक्रीचा मारादेखील दिसून आला. दिवसभराच्या विक्रमी उच्चांकानंतर निफ्टीमध्ये ३५ तर सेन्सेक्सने १२० अंकांची वाढ कमावली. व्यवहाराच्या सुरुवातीला सेन्सेक्स ४९१ अंकांच्या वाढीसह २९४३७ या पातळीवर तर निफ्टी १५७ अंकांच्या तेजीसह ९,०९२ या पातळीवर उघडला होता. याआधी पाच मार्च २०१५ रोजी निफ्टी ८,९३७.७५ तर सेन्सेक्स २९,४४८.९५ या पातळीपर्यंत गेला होता.

  बीएसईमध्ये लिस्टेट सर्व कंपन्यांचा एकूण मार्केट कॅप ११८.९ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर बंद झाला. ही बीएसईच्या मार्केट कॅपची आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी पातळी आहे. मार्च महिन्यामध्ये दोन वेळा एक मार्च आणि सहा मार्च रोजी बीएसईवर लिस्टेड सर्व कंपन्यांचा मार्केट कॅप ११८ लाख कोटी रुपयांच्या वरती बंद झाला होता.

  भारतीय शेअर बाजारात मंगळवारी झालेल्या व्यवहारात सुमारे १०० शेअर वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचले. यस बँक, वर्धमान टेक्स्टाइल्स, विसाका इंडस्ट्रीज, एल अँड टी फायनान्स होर्डिंग्ज, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, धानुका अॅग्रीटेक, केनफिन होम फाइनान्ससह ३५ पेक्षा जास्त शेअर “ऑल टाइम हाय’वर पोहोचले आहेत.

  बँकिंग क्षेत्रात खरेदी
  बँकिंग क्षेत्रात झालेल्या जोरदार खरेदीमुळे बँक निफ्टी दोन टक्क्यांच्या वाढीसह “आॅलटाइम हाय’ २१,२७४ या पातळीवर पोहोचला. मwिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्येही चांगली खरेदी नोंदवण्यात आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.४३ टक्के तर स्मॉलकॅप निर्देशांक १.१९ टक्क्यांच्या मजबुतीसह बंद झाले.

  गुंतवणूकदारांनी कमावले १.३० लाख कोटी रुपये
  भारतीय बाजारात आलेल्या तेजीमुळे मुंबई शेअर बाजारात लिस्टेड सर्व कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ११८.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वेळेच्या बंद पातळीशी तुलना केल्यास गुंतवणूकदारांनी १.३० लाख कोटी रुपये कमवले आहेत.

Trending