आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक घटनांमुळे चढती कमान कायम, बाजारात उत्साह वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विदेशी भांडवलाचा ओघ, सेवा क्षेत्रात झालेली चांगली वाढ या सकारात्मक घडामोडींमुळे सलग दुसऱ्या आठवड्यात सेन्सेक्सने आपली चढती कमान कायम राखली.
एक्स्चेंज ट्रेडेड फंडाच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने गुरुवारपासून शेअर बाजारात गुंतवणुकीस सुरुवात केल्यामुळेदेखील बाजाराचा उत्साह वाढला असून सातत्याने खरेदी होत आहे. त्याचाही परिणाम बाजारावर झाला.

नवीन ऑर्डर्समध्ये वाढ झाल्यामुळे सलग दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर जुलै महिन्यात वाढीची नोंद केली. निक्की इंडियाच्या सेवा व्यवसाय कामकाज निर्देशांकात गेल्या तीन महिन्यांत पहिल्यांदाच वाढ झाली आहे. त्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला. आठवड्याच्या शेवटी काही निवडक बँका औषध कंपन्यांच्या समभागांवर विक्रीचा ताण आला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,०८९.०९ अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला, परंतु दिवसअखेर त्यात १२१.८३ अंकांची वाढ होऊन तो २८,२३६.३९ अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दोन आठवड्यांत सेन्सेक्समध्ये १२४.०८ अंकांची वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक ३१.७५ अंकांनी वाढून ८५६४.६० अंकांच्या पातळीवर बंद झाला आहे. निफ्टीमध्ये दोन आठवड्यांत ३१.७५ अंकांची वाढ झाली आहे.

नुकत्याच संपलेल्या या आठवड्यामध्ये रिझर्व्ह बँकेने महागाईच्या चिंतेचे कारण देत ४ ऑगस्टला झालेल्या नाणेनिधी धोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर जैसे थे
ठेवल्यामुळे बाजाराची निराशा झाली. सार्वजनिक क्षेत्रातील भेल या कंपनीच्या निव्वळ नफ्यात ८२.४८ टक्क्यांची घट झाल्यामुळेही बाजाराचा मूड गेला.

टॉप गेनर्स : टाटा स्टील, डॉ. रेड्डी, हिंदाल्को

टॉप लुझर्स : कोल इंडिया, भेल, गेल इंडिया, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल

सोन्याची नीचांकी पातळी
गेल्या चार ते पाच आठवड्यांपासून सोने आणि चांदीच्या दरातदेखील सातत्याने घसरण होत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या वतीने होणारी संभाव्य व्याजदर वाढ, ग्रीसचे संकट आणि डॉलरवर होणारा परिणाम यामुळे सोने गेल्या चार वर्षांतील नीचांकी पातळीवर आले आहे. सोन्याच्या भावात भविष्यात आणखी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बाजारात सावध व्यवहार
नव्या आठवड्यामध्ये अमेरिकेतील रोजगार आकडेवारी जाहीर होणार असून त्यावर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीचा निर्णय अवलंबून असेल. त्यामुळेदेखील बाजारात
सावध व्यवहार झाल्याचे मत जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख अॅलेक्स मॅथ्यू यांनी व्यक्त केले. विदेशी गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा कायम ठेवला आहे. सेबीकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार विदेशी गुंतवणूकदरांनी सात ऑगस्टला १,६८३.७८ काेटी रुपयांची समभाग खरेदी केली आहे.