आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरणीवर लगाम, सेन्सेक्स ३५९, तर निफ्टी १११ अंकांनी वाढून बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जागतिक बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे देशातील बाजार जोरदार तेजीसह बंद झाला. बुधवारी झालेल्या मोठ्या पडझडीनंतर गुरुवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १.५० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील फार्मा इंडेक्स सोडून सर्वच क्षेत्रांतील इंडेक्स मजबुतीसह बंद झाले. व्यवहाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स ३५९ अंकांनी वाढून २५,८४२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी १.४३ टक्क्यांनी वाढून ७८४२ च्या पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजारात गुरुवारच्या सत्रामध्ये फार्मा इंडेक्स सोडला तर इतर सर्व क्षेत्रांतील इंडेक्स हिरव्या निशाणावर बंद झाले. ऑइल आणि गॅस, आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि ऑटो स्टॉक्समध्ये खरेदी झाल्यामुळे तेजी आली. मुंबई शेअर बाजारातील ऑइल आणि गॅस, आयटी, ग्राहकोपयोगी वस्तू, बँकिंग आणि ऑटो इंडेक्समध्ये १.७ ते १.३ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बँक निफ्टी १.५ टक्के, ऑटो १.४ टक्के, ऊर्जा १.९ टक्के आणि मीडिया इंडेक्स २.८० टक्क्यांनी वाढू बंद झाला. मात्र, फार्मा इंडेक्समध्ये वाढ नोंदवली गेली नाही.

मिडकॅप स्टॉक्समध्ये तेजी
गुुरुवारच्या सत्रात दिग्गज शेअरमध्ये बजाज ऑटो, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, जी एंटरटेनमेंट, एचडीएफसी, वेदांता, इन्फोसिस आणि मारुती सुझुकीसारखे दिग्गज शेअर सर्वात जास्त ३.६ ते २.६ टक्क्यांनी मजबूत होऊन बंद झाले. तसे पाहिले तर डॉ. रेड्डीज, सन फार्मा, आयडिया सेल्युलर, कोल इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि अॅक्सिस बँकसारखे दिग्गज शेअरमध्ये २.६ ते ०.१५ टक्क्यांपर्यंतच्या घसरणीसह बंद झाले.

मिडकॅप शेअरमध्ये इंजिनिअर्स इंडिया, अरविंद, स्पाइसजेट, गृह फायनान्स आणि रेप्को होम्स सर्वात जास्त १०.३ ते ८.६ टक्क्यांनी वाढून बंद झाले. स्मॉलकॅप शेअरमध्ये अन्सल प्रॉपर्टीज, बटरफ्लाय, जिनिसिस इंटरनॅशनल, ऑरिकॉन एंटरप्रायजेस आणि इंडो रामा सिंथेटिक सर्वात जास्त वाढीसह म्हणजेच २० ते १० टक्क्यांनी वाढून बंद झाले.
जागतिक बाजारात तेजी
जागतिक बाजारात गुरुवारच्या सत्रात जोरदार तेजी दिसून आली. जपानचा निक्केई १.०७ टक्के, चीन आणि हाँगकाँगचे बाजार १.४० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर युरोपीय बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीचे इंडेक्सदेखील १.५ टक्क्यांनी वाढले.

मर्यादेतच व्यवहार होतील
डिसेंबर महिन्यात अमेरिकेत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. अशा स्थितीत अलीकडच्या कालावधीत बजारासाठी कोणतीच मोठी चांगली बातमी येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सध्यातरी बाजारात मर्यादेतच व्यवहार होतील, असे मत सेंट्रम वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुंज बन्सल यांनी व्यक्त केले. येत्या काही दिवसांपर्यंत बाजारातील व्यवहार मर्यादेतच दिसून येतील तसेच काही दिवस विक्रीचा मारादेखील दिसून येऊ शकतो, अशी शक्यता बन्सल यांनी व्यक्त केली आहे.

जागतिक परिणाम
अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या गेल्या बैठकीचे मिनिट्स जाहीर झाले आहेत. यात डिसेंबरमध्ये व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात अाली आहे. असे असले तरी व्याजदरात वाढ होण्याच्या शक्यतेला बाजाराने सकारात्मक दृष्टीने पाहिले, ज्याचा परिणाम आशियाई बाजारावर दिसून आला. जपानचा बेंचमार्क इंडेक्स निक्केई ३ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर गेला आहे. या सर्व जागतिक संकेतांचा परिणाम भारतीय बाजारावरदेखील दिसून आला.