टीसीएसची 16,000 कोटींच्या / टीसीएसची 16,000 कोटींच्या शेअर ‘बायबॅक’ची घोषणा

Feb 21,2017 07:03:00 AM IST
नवी दिल्ली -बाजारमूल्याच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टीसीएसने सोमवारी शेअर बायबॅकच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनी २८५० रुपये प्रति शेअरच्या दराने १६ हजार कोटी शेअर बायबॅॅक करणार आहे. ही किमत कंपनीच्या सध्याच्या मूल्यापेक्षा सुमारे १२ टक्के जास्त आहे. कंपनीच्या वतीने या निर्णयाची घोषणा होताच कंपनीच्या शेअरमध्ये ५ टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य सुमारे १९ हजार कोटी रुपयांनी वाढले आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये टीसीएसने सुमारे ५.६ कोटी शेअरच्या बायबॅकची घोषणा केली आहे. बायबॅक २८५० रुपयांच्या पातळीवर घेण्यात येणार आहे. या बायबॅकसाठी जास्तीत जास्त १६ हजार कोटी रुपये ठेवण्यात आले असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. कंपनीच्या एकूण भांडवलाचा विचार केल्यास या बायबॅक करण्यात येणाऱ्या शेअरची भागीदारी २.८५ टक्के असणार आहे. या बायबॅकची पद्धत, निश्चित कालावधी यासह इतर माहिती लवकरच जाहीर करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
बायबॅकची कारणे
-या आयटी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात नगदी जमा झाले असल्याने कंपनीच्या शेअरधारकांनी बायबॅकसाठी दबाव टाकला होता.
-टीसीएसजवळ सुमारे ४० हजार कोटी रुपये नगदी आहेत.

- या नगदी रकमेचे टीसीएस काय करणार, असा प्रश्न गुंतवणूकदार विचारत होते.
- कंपनीत नगदी ठेवण्याऐवजी बायबॅकच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याचा सल्ला कंपनीच्या माजी अधिकाऱ्यांनी दिला होता.
शेअर बाजारात तेजी
बायबॅकची घोषणा होताच कंपनीच्या शेअरमध्ये तेजी नोंदवण्यात आली. टीसीएसच्या शेअरमध्ये ४.०८ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून २५०६ या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर कंपनीच्या बाजारमूल्यात १९३८० कोटी रुपयांची वाढ दिसून आली. या वाढीसह कंपनीचे बाजारमूल्य ४.९४ लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहे. दिवसभराच्या व्यवहारात शेअर पाच टक्क्यांच्या वाढीसह तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.
व्ही. रामाकृष्णन सीएफओ
टीसीएसने व्ही. रामाकृष्णन यांना कंपनीचे नवीन सीएफओ म्हणून नियुक्ती दिली आहे. त्यांनी नियुक्ती २१ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
X