आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफेखोरीने सेन्सेक्स गडगडला, निर्देशांकांचा आठवड्याचा नीचांक, सराफ्यात तेजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी नफा पदरात पाडून घेण्यावर भर दिला. मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीने विशेषकरून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागाच्या विक्रीने बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स १३३.६५ अंकांनी घसरून २८,६६६.०४ वर आला. निफ्टी ४३.५० अंकांच्या घटीसह ८,७०६.७० वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांचा हा आठवड्याचा नीचांक आहे.

ब्रोकर्सनी सांगितले, कंपन्यांच्या जानेवारी ते मार्च या तिमाहीतील आर्थिक निकालाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सतर्कतेचा पवित्रा घेतला. नफा वसुलीवर भर दिसून आला. आयटी, एफएमसीजी आणि बँकांच्या समभागांना या विक्रीचा फटका बसला. अमेरिकेतील बाजारात बुधवारी आलेल्या तेजीमुळे आशियातील बहुतेक बाजारात सकारात्मक कल होता. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने उत्तम सुरुवात केली होती. नंतर झालेल्या विक्रीने सेन्सेक्सची सर्व आघाडी मोडीत निघाली. त्यातच विदेशी गुंतवणूकदारांनीही विक्री सुरूच ठेवल्याने घसरण जास्त वाढली. आशियातील प्रमुख बाजारात तेजी तर युरोपातील प्रमुख बाजारात घसरणीचा कल होता. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी १८ समभाग घसरले तर १२ वधारले.

टीसीएसला फटका केईसीला फायदा
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनीचे समभाग निकालाच्या पार्श्वभूमीवर आपटले. टीसीएसचा निकाल जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांनी या शेअरची विक्री करणे पसंत केले. टीसीएसचा शेअर १.५६ टक्क्यांनी घसरून २५८५.२० रुपयांवर बंद झाला. इंट्रा डे व्यवहारात या समभागात २.१६ टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली, तर केईसी कंपनीने टेलिकॉम टॉवर व्यवसायासाठी एटीसी टेलिकॉमशी करार केल्याने केईसीच्या शेअर्समध्ये तेजी आली. केईसीचा समभाग ९.१३ टक्के वाढीसह ११० रुपयांवर बंद झाला. इंट्रा डे व्यवहारात केईसी समभागात १२ टक्क्यांची तेजी दिसून आली.

टॉप लुझर्स
हीरो मोटोकॉर्प, सन फार्मा, सिप्ला, लार्सन, डॉ. रेड्डीज लॅब, सेसा स्टरलाइट, टीसीएस
टॉप गेनर्स
ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदाल्को.

सोने, चांदी चकाकले
नवी दिल्ली | आगामी लग्नसराई आणि जागतिक सराफ्यातील सकारात्मक कल यामुळे देशातील सराफ्यात तेजी दिसून आली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे २१० रुपयांनी वाढून २७,०८० झाले, तर चांदी किलोमागे २०० रुपयांनी चकाकून ३७,००० वर पोहोचली.

सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले, जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक कल आणि देशातील सराफ्यात वाढलेली मागणी यामुळे सोने,चांदीच्या किमती वाढल्या. आगामी लग्नसराईमुळे ज्वेलर्स व रिटेलर्सकडून सोन्याला चांगली मागणी आली. सिंगापूर सराफ्यातही सोने औंसमागे (२८.३४ ग्रॅम) ०.४ टक्क्यांनी वाढून १२०७.७० डॉलरवर पोहोचले. तर चांदी औंसमागे ०.३ टक्क्यानी वाढून १६.४० डॉलर झाली. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढीचे संकेत देत असल्याने जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली. देशातील लग्नसराईच्या हंगामी मागणीने सोन्याच्या किमतीला बळकटी आली. मागील दोन सत्रात सोने तोळ्यामागे २५० रुपयांनी स्वस्त झाले होते. ही घसरण सोन्याने गुरुवारी भरून काढली.