Home | Business | Share Market | NSE to bring 10,000 crore IPO in stock market

एनएसई 10,000 कोटींचे आयपीओ आणणार

वृत्तसंस्था | Update - Dec 30, 2016, 03:39 AM IST

राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) आयपीओसंदर्भातली कागदपत्रे सोमवारी बाजार नियामक सेबीकडे दाखल केली आहेत.

 • NSE to bring 10,000 crore IPO in stock market
  नवी दिल्ली - राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) आयपीओसंदर्भातली कागदपत्रे सोमवारी बाजार नियामक सेबीकडे दाखल केली आहेत. आयपीओच्या माध्यमातून १०,००० कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. हा गेल्या सहा वर्षांतील सर्वात मोठा आयपीओ आहे. याआधी २०१० मध्ये कोल इंडियाने १५,००० कोटी रुपयांचा आयपीओ आणला होता. आयपीओच्या माध्यमातून एनएसईमधील सध्याचे शेअरधारक २० ते २५ टक्के भागीदारी ‘ओपन ऑफ सेल’अंतर्गत विक्री करू शकतात. या विक्रीनंतर एक्स्चेंजचे मूल्यांकन ५०,००० ते ५५,००० कोटी रुपयांपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा प्रतिस्पर्धी मुंबई शेअर बाजारदेखील (बीएसई) १५०० कोटी रुपयांचे आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. बीएसईने सप्टेंबर महिन्यातच सेबीकडे आयपीओसंदर्भातील कागदपत्रे जम केलेली आहेत. याव्यतिरिक्त बीएसईच्या वतीने प्रमोडेट सीएसडीएसनेदेखील मंगळवारी सेबीकडे आयपीओची कागदपत्रे जमा केली आहेत. आयपीओच्या माध्यमातून यांची ३.५ कोटी शेअर विक्री करण्याची योजना आहे. सध्या देशात शेअर बाजारात लिस्टेड असलेले एमसीएक्स हे एकमेव एक्सचेंज आहे.

  राष्ट्रीय शेअर बाजाराने आयपीओचे नियोजन करण्यासाठी सिटी ग्रुप, मॉर्गन स्टॅनली, जेएम फायनान्शियल सिक्युरिटीज आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनीला मर्चंट बँकर म्हणून नियुक्त केले आहे. आयपीओच्या लिस्टिंग प्रक्रियेसाठी आधीच लिस्टिंग समिती बनवण्यात आलेली आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर एनएसईने जूनमध्ये शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या योजनेचा खुलासा केला आहे. त्याबरोबर आयपीओ आणण्यासाठी ३१
  जानेवारी २०१७ अंतिम दिनांक निश्चित केला आहे.

  महिन्याच्या सुरुवातीलाच चित्रा रामाकृष्ण यांचा राजीनामा : आयपीओ आणण्याच्या तयारीदरम्यान २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक चित्रा रामाकृष्ण यांनी राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ मार्च २०१८ मध्ये पूर्ण होणार होता. चित्रा यांनी एप्रिल २०१३ मध्ये रवी नारायण यांच्याकडून हा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर जे. रविचंद्रन यांना राष्ट्रीय शेअर बाजारात मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आले. त्यांच्याकडे समूह अध्यक्षपदाचीही जबाबदारी आहे. रवी नारायण राष्ट्रीय शेअर बाजाराचे उपाध्यक्ष आहेत.
  ब्रोकर्सचा प्रवेश
  राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सर्व्हरमध्ये काही ब्रोकर्सचा अनावश्यक प्रवेश झाला असल्याची माहिती राष्ट्रीय शेअर बाजाराच्या वतीने जाहीर करण्यात करण्यात आली आहे. यासंबंधीचा खुलासा फॉरेन्सिक ऑडिटमध्ये झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व्हरपर्यंत ब्रोकर पोहोचले असल्याचे संकट समोर आल्यामुळे आयपीओ आणण्याच्या निर्णयावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  पहिल्या सहामाहीत ५८८.३२ कोटी नफा
  चालू आर्थिक वर्षादरम्यान ३० सप्टेंबरला संपलेल्या पहिल्या सहामाहीत राष्ट्रीय शेअर बाजाराला ५८८.३२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. तर एकूण उत्पन्न १,३४३.५१ कोटी रुपयांचे झाले. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराला ४४६.५३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. त्यातच आयपीओमुळे नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Trending