आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक तणावाने शेअर बाजाराचे नुकसान नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये घुसून तेथील दहशतवाद्यांवर २९ सप्टेंबर रोजी “सर्जिकल स्ट्राइक’ केल्याची बातमी येताच मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स अचानक ४६५ अंकांनी घसरला. रुपयादेखील एक डॉलरच्या तुलनेत ३९ पैशाच्या घसरणीसह ६६.८६ वर आला होता. अशा परिस्थितीत भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झाले तर त्याचा गुंतवणुकीवर काय परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित करणे स्वाभाविकच आहे. शेअरमधील ही घसरण पुढील काळातही सुरूच राहील का? शक्यतो नाही. जोपर्यंत पाकसोबतचा तणाव एखाद्या युद्धात परावर्तित होत नाही तोपर्यंत याची शक्यता दिसत नाही. मात्र, बदला घेण्याची कारवाई नक्कीच होऊ शकेल. पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या जम्मू-काश्मीर आणि उर्वरित भारतात आतंकवादी हल्ला होऊ शकतो. तसे पाहिले तर वेळोवेळी होणाऱ्या अशा आतंकवादी हल्ल्यांची सवय आपल्या शेअर बाजाराला झाली आहे.

भारत-पाकिस्तानदरम्यानच्या व्यवसायावर परिणाम होईल यात शंका नाही. भारतातून पाकिस्तानमध्ये दोन अब्ज डॉलरची जी निर्यात होते त्यात घट होईल. मात्र, आपल्या एकूण निर्यातीचा विचार केल्यास पाकमधील निर्यात एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. पाकिस्तानमध्ये निर्यात होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी सुमारे ३० टक्के हिस्सा कापसाचा असून यामुळे या क्षेत्राला सरकारी मदतीची आवश्यकता पडू शकते. वास्तविक कापसाची निर्यात थांबणार नाही. मग ती सरळ निर्यात असेल किंवा कोणत्या तरी तिसऱ्याच देशाच्या माध्यमातून असेल. याआधी ज्या-ज्या वेळी दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला त्या-त्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रदर्शन कसे राहिले यावर नजर टाकणे योग्य ठरेल. वर्ष १९९९ मध्ये जेव्हा कारगिल युद्ध झाले त्या वेळी देशाचा विकास दर ८ टक्के होता. हे युद्ध दाेन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत सुरू होते. चांगला विकास दर होता. त्या वेळी शेअर बाजाराची स्थिती कशी असेल, यावर बारकाईने नजर टाकूया. कारगिल युद्ध मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते जुलैच्या शेवटपर्यंत सुरू होते. या दरम्यान सेन्सेक्सने ३९ टक्क्यांची वाढ मिळवली होती. विदेशी गुंतवणूकदारांकडून जास्तीची गुंतवणूक हे याचे प्रमुख कारण होते, हेदेखील खरे आहे. मात्र, त्याच सोबत “डॉट कॉम’ बूममुळे जगभरातील बाजाराला मजबुती मिळाली होती. मात्र, त्या वेळी गुंतवणुकीचे अनेक पर्यायदेखील उपलब्ध होते. त्यामुळे या तेजीचा फायदा फक्त भारताला मिळाला असे म्हणता येणार नाही. या प्रमाणे बाजारावर कारगिल युद्धाचा काहीही परिणाम झाला नाही.

मात्र, या वेळी जग आर्थिक संकटात आहे. अमेरिका, युरोप, जपान आणि चीन आदी सर्व देशांत मंदीची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्था सर्वात चांगल्या स्थितीत असून यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारात गुंतवणूक करणे जास्त योग्य वाटत आहे. मोदी सरकारने एक एप्रिल २०१७ पासून देशभरात जीएसटी लागू करण्याची तयारी केली आहे. अशा स्थितीत विदेशी गुंतवणूकदार शेअरमध्ये घसरण आल्यास विक्री करण्याऐवजी खरेदी करू शकतात.

या वर्षी सप्टेंबरपर्यंत संस्थागत विदेशी गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भारतीय शेअर बाजारात ७ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आणखी कमजोर झाला तर त्यांची गुंतवणूक आणखी वाढू शकते. मात्र, या वेळी बाजार दोन कारणांमुळे वाढू मिळवू शकतो. आधी एफआयआय एकमात्र मोठे खरेदीदार होते. ज्या वेळी त्यांनी विक्री केली, त्या वेळी बाजारात घसरण होत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत भारतीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढली आहे. एनडीए सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) गुंतवणूक योग्य रकमेतून इक्विटीमध्ये १० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे दरवर्षी अतिरिक्त १३,००० कोटी रुपये शेअर बाजारात येतील. हा पैसा ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स) माध्यमातून अप्रत्यक्ष स्वरूपात इक्विटीमध्ये गुंतवला जाईल. यादरम्यान, किरकोळ गुंतवणूकदारदेखील स्मार्ट झाला आहे. ते इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी “सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’चा (एसआयपी) वापर करत आहेत. एका अंदाजानुसार दर महिना सुमारे ३,००० कोटी रुपये एसआयपीच्या माध्यमातून शेअर बाजारात येत आहेत.

भारतीय बाजारातून होणाऱ्या या गुंतवणुकीला पाहता तसेच पाकिस्तानसोबतचा तणाव आणखी वाढणार नाही अशी शक्यता धरून, शेअर बाजारात किरकोळ घसरणीपेक्षा जास्त काही दिसण्याची शक्यता नाही. सध्या तरी किमती जास्त आहेत. तणाव वाढला आणि भारतीय शेअर बाजारात घसरण झाली तर गुंतवणुकीची इच्छा असलेल्या लोकांना खरेदी करण्याची आणखी एक संधी मिळेल.

आर. जगन्नाथन
rjagannathan@dbcorp.in लेखक आर्थिक विषयाचे ज्येष्ठ पत्रकार, फर्स्टपोस्ट डॉट कॉमचे संपादक आहेत.
बातम्या आणखी आहेत...