Home | Business | Share Market | rise in share market, sensex crosses 33 thousand

बँकांना सरकारची भांडवली रसद, बाजारात तेजीची दिवाळी; सेन्सेक्स 33 हजार पार

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Oct 26, 2017, 03:00 AM IST

संवत्सराच्या मुहूर्ताला घसरणीचा कल दाखवणाऱ्या शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून तेजीची दिवाळी दिसून आली.

 • rise in share market, sensex crosses 33 thousand
  मुंबई - संवत्सराच्या मुहूर्ताला घसरणीचा कल दाखवणाऱ्या शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून तेजीची दिवाळी दिसून आली. सरकारने मंगळवारी बँकांसाठी दिलेला २.११ लाख कोटींचा भांडवली डोस आणि रस्ते बांधणीसाठी दिलेला ६.९२ लाख कोटी रुपयांचा निधी यामुळे बुधवारी बाजारात तेजीने उच्चांक गाठला.
  गुंतवणूकदारांनी भरभरून खरेदी केल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक ४३५.१६ अंकांनी उसळून प्रथमच ३३ हजारांच्या पार गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८७.६५ अंकांच्या उसळीसह १०२९५.३५ वर स्थिरावला. दोन्ही निर्देशांकांचा हा सर्वकालीन उच्चांक आहे.
  केंद्र सरकारने मंगळवारी रात्री बँकिंग आणि पायाभूत सुविधांसंदर्भात मोकळ्या हाताने निधी देण्याची घोषणा केली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकारकडून २.११ लाख कोटी रुपये भांडवलाच्या स्वरूपात मिळणार आहेत, तर देशातील विविध राज्यांतील रस्ते बांधणीसाठी सरकार ६.९२ लाख कोटी रुपये देणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली.
  सरकारच्या या घोषणेचे बुधवारी शेअर बाजाराने जाेरदार तेजीने स्वागत केले. गुंतवणूकदारांच्या बँक समभागावर उड्या पडल्या. सार्वजनिक क्षेत्रातील जवळपास सर्वच बँकांबरोबर खासगी क्षेत्रातील बँकांच्या समभागांना मोठी मागणी आली. त्यामुळे स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अलाहाबाद बँक, आयडीबीआय बँक आणि सिंडिकेट बँकांचे शेअर्स ४६.२० टक्क्यांपर्यंत वधारले, तर खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय अाणि अॅक्सिस बँकेचे शेअर्स १४.६९ टक्क्यांपर्यंत वाढले.
  दोन्ही निर्देशांकांचा सर्वकालीन उच्चांक
  निफ्टी अाणि सेन्सेक्सने बुधवारच्या तेजीत सर्वकालीन उच्चांक नोंदवले. निफ्टीने इंट्रा डे व्यवहारात १०३४०.५५ ही पातळी नोंदवली, मात्र सत्राअखेर तो १०२९५.३५ वर बंद झाला. निफ्टीने १७ ऑक्टोबरचा १०२३४.४५ चा विक्रम मोडला. सेन्सेक्सने ३३०४२.५० हा नवा विक्रम नोंदवताना १६ ऑक्टोबरचा ३२६३३.६४ ही विक्रमी पातळी मागे टाकली.
  जनरल इन्शुरन्सला विक्रीचा फटका
  जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या समभागांची इश्यूच्या ९१२ रुपये दराच्या तुलनेत ८५० रुपये पातळीवर लिस्टिंग झाली. त्यानंतरही त्यात घसरण दिसून आली. सत्राअखेर हा शेअर ४.५६ टक्के घसरणीसह ८७०.४० वर बंद झाला.
  इन्फोसिसचे शेअर्स घसरून वधारले
  इन्फोसिसच्या दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीवर नाराज झालेल्या गुंतवणूकदारांनी सत्राच्या प्रारंभी इन्फोसिसची विक्री करण्यावर भर दिला. त्यामुळे सकाळच्या सत्रात इन्फोसिसचे शेअर्स १.२४ टक्क्यांच्या घसरणीसह ९१५.२५ रुपयांपर्यंत खाली आले होते. नंतर मात्र खरेदी वाढल्याने शेअर्स ०.९३ टक्क्यांनी वाढून ९३५.४० रुपयांवर स्थिरावले.
  रस्ते विकासक शेअर्स चमकले
  देशातील विविध राज्यांतील रस्ते बांधणीसाठी सरकार ६.९२ लाख कोटी रुपये देणार असल्याचे स्पष्ट होताच रस्ते बांधणी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना मागणी आली. अशोका बिल्डकॉन, सद्भाव इन्फ्रास्ट्रक्चर, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स, आयआरबी इन्फ्रा. कंपन्यांच्या शेअर्समध्ये ८.७१ टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली.

Trending