नवी दिल्ली - आठवड्याच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजार २० महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाले. शेवटच्या तासात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे सेन्सेक्स २६६.६७ अंक आणि निफ्टी ८६.८० अंकांच्या घसरणीसह बंद झाला.
मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १.०९ टक्क्यांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १.१७ टक्यांची घसरून ७३५१ च्या पातळीवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २१ मे २०१४ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर बंद झाला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निर्देशांक निफ्टी ३ जून २०१४ नंतर सर्वात खालच्या पातळीवर आला आहे. तसेच यादरम्यान मिडकॅप निर्देशांकातही मोठ्या प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप निर्देशांक १८ डिसेंबर २०१४ च्या नीचांकी पातळीवर बंद झाला.
निफ्टीला ७३०० च्या पातळीवर मजबूत आधार असून तेथे ट्रेडिंग बाउन्स येण्याची शक्यता असल्याचे मत एंजल ब्रोकिंगचे समित चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. मात्र, येथून ५० ते ६० अंकांची घसरण आली तर त्यावर कमी कालावधीसाठी गुंतवणूक करून ठेवावी. एकही सकारात्मक बातमी आली तर निफ्टीला १५० ते २०० अंकांची तेजी येण्याची शक्यताही चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
सर्व क्षेत्रांत घसरण
राष्ट्रीय शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल निशाणीवर बंद झाले. रिअॅल्टी क्षेत्रात ३.६८ टक्के तर पॉवर क्षेत्रात ३.७० टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. मीडिया शेअर २.७३ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. सरकारी कंपन्यांचे शेअर २.२७ टक्क्यांची खाली बंद झाले.