आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक थंडी, बाजाराला हुडहुडी, सेन्सेक्स 418 अंकांनी, निफ्टी 126 अंकांनी कोसळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील दिग्गज अर्थव्यवस्थांत वाहत असलेले आर्थिक मंदीचे थंड वारे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक आर्थिक विकासाबाबत व्यक्त केलेली चिंता, कच्च्या तेलाच्या सातत्याने घसरणाऱ्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मोठे अवमूल्यन यामुळे देशातील शेअर बाजाराला बुधवारी घसरणीची हुडहुडी भरली. परिणामी सेन्सेक्स ४१७.८० अंकांनी घसरून २४,०६२.०४ वर आला. निफ्टीही १२५.८० अंकांनी कोसळून ७,३०९.३० वर स्थिरावला.
या पडझडीत गुंतवणूकदारांचे १.८४ लाख कोटींचे नुकसान झाले.
दलालांनी सांगितले, चीनमधील आर्थिक मळभ दाट होत असतानाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जगाचा आर्थिक विकास मंदावणार असल्याचा अहवाल दिला आहे. यंदा जागतिक आर्थिक विकास ३.४ टक्के राहील, असे नाणेनिधीच्या अहवालात म्हटले आहे. तसेच २०१७ मध्येही हा वाढीचा दर ३.६ टक्केच राहील. त्यामुळे जगभरातील आर्थिक जगतात चिंता पसरली. त्याचा परिणाम जगातील प्रमुख शेअर बाजारांवर झाला. युरोप आणि आशियातील शेअर बाजारांत बुधवारी सकाळपासूनच गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला. त्यातच कच्च्या तेलाचा पुरवठा आगामी काळात जास्त होणार असल्याचे संकेत मिळाले. कच्चे तेल पुन्हा घसरले.
मुंबई शेअर बाजारात दिग्गज समभागांना विक्रीचा जोरदार फटका बसला. रिलायन्स, एसबीआय, कोल इंडियासारखे समभाग घसरले. सेन्सेक्सच्या यादीतील ३० पैकी २७ समभाग मोठ्या घसरणीसह बंद झाले.
घसरणीची कारणे
- जागतिक आर्थिक विकास आगामी दोन वर्षे मंद राहील, असा नाणेनिधीचा अहवाल
- कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी घसरण, १२ वर्षांचा नीचांक
- डॉलरच्या तुलनेत रुपयाचे जास्त प्रमाणात अवमूल्यन
- चीनमधील विविध आर्थिक आकडेवाऱ्यांतील घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपयाचा २८ महिन्यांचा नीचांक
देशातील शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने आयातदारांकडून डॉलरला मोठी मागणी आली. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपया २३ पैशांनी घसरून ६७.९५ वर बंद झाला. हा रुपयाच्या मूल्याचा २८ महिन्यांचा नीचांक आहे.
सोने चकाकले
शेअर बाजारातील घसरणीचा चांगला लाभ सोन्याला झाला. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोने तोळ्यामागे ३४० रुपयांनी चकाकून २६,६९० झाले. सोने किमतीचा हा दोन महिन्यांचा उच्चांक आहे. चांदीही किलोमागे ४०० रुपयांनी वाढून ३४,४०० झाली.
गुंतवणूकदारांचे १ लाख ८४ हजार कोटींचे नुकसान
जागतिक आर्थिक विकासाच्या मंदगतीच्या अंदाजाने शेअर बाजारात झालेल्या जोरदार विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे १.८४ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. सेन्सेक्सने ४१८ अंकांच्या घसरणीसह १६ मे २०१४ अशी दीड वर्षाची नीचांकी पातळी गाठली. सेन्सेक्समध्ये सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य १,८४,०८६ कोटींनी घटून ९०,६४,७३४ कोटींवर आले.
घसरलेले दिग्गज
अदानी पोर्ट््स, एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, मारुती, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, ओएनजीसी, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक
मंदीतही साधा संधी
गुंतवणूकदारांनी आता सावधपणे व्यवहार करावेत. प्रत्येक घसरण अर्थात मंदी ही चांगल्या गुंतवणुकीची संधी असते, हे लक्षात घेऊन व्यवहार करावेत. जागतिक मंदीसदृश चित्र असले तरी भारतीय अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. त्यामुळे बाहेरचा पैसा आपल्या बाजारात येईल. त्यामुळे चांगल्या समभागांची निवड करून विचारपूर्वक खरेदी करावी.
विश्वनाथ बोदडे, गुंतवणूक सल्लागार