आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कर'करीत घसरण, विक्रीचा धडाका; विदेशी फंड विक्रीने सेन्सेक्स २८ हजारांखाली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पूर्वलक्षी प्रभावाने कर आकारणीच्या मुद्द्यावरून विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे सोमवारी शेअर बाजारात घसरणीची सुनामी आली. यामुळे सेन्सेक्स ५५५.८९ अंकांनी घसरून २७,८८६.२१ वर आला. निफ्टीने १५७.९० अंकांच्या घसरणीसह ८,४४८.१० अशी पातळी नोंदवली.
देशाच्या निर्यातीत मार्चमध्ये झालेली २१ टक्के घट, यूबीएसने घटवलेली निफ्टीची पातळी व जगभरातील शेअर बाजारातील नकारात्मक कल याचाही परिणाम शेअर बाजारातील व्यवहारांवर झाला. त्यातच गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिल्याने घसरण वाढली. यामुळे गुंतवणूकदारांची संपत्ती १.५९ लाख कोटीने कमी झाली.
शेअर बाजारातील तेजीला मागील चार सत्रांपासून घसरणीचे ग्रहण लागले आहे. मार्च तिमाहीतील कंपन्यांच्या निकालांनी गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. त्यातच यूबीएस या संस्थेने निफ्टीच्या पातळीबाबतचा अंदाज ९,६०० वरून ९,२०० पर्यंत घटवला आहे. देशाच्या निर्यातीने मार्चमध्ये सहा वर्षांचा नीचांक गाठला आहे. त्याच पूर्वलक्षी करआकारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्याने विदेशी गुंतवणूकदारनी विक्रीचा धडाका लावला. या सर्वांच्या एकत्रित परिणामाने शेअर बाजारात घसरणीची जणू सुनामीच आली आणि सेन्सेक्स २८ हजारांच्या खाली आला.

घसरणीची कारणे
- पूर्वलक्षी कर आकारणीच्या मुद्द्यावरून विदेशी फंडांची विक्री
- देशाच्या निर्यातीचा मार्चमध्ये सहा वर्षांचा नीचांक
- यूबीएस संस्थेने निफ्टीबाबत घटवलेला अंदाज
- मार्च तिमाहीतील कंपन्यांची निराशाजनक कामगिरी

रुपयाचीही दाणादाण
शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा धडाका लावल्याने रुपयाच्या मूल्यावर दबाव आला. डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ पैशांनी घसरून ६२.९१ पर्यंत घसरला. हा रुपयाचा एक महिन्याचा नीचांक आहे. त्यातच निर्यातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने रुपया आणखी घसरला.

स्मॉल-मिड कॅपला फटका
बाजारात सुरू असलेल्या घसरणीचा फटका स्मॉल व मिड कॅप कंपन्यांच्या समभागांना बसला आहे. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप इंडेक्स २.१७ टक्क्यांनी, तर मिड कॅप इंडेक्स २.०२ टक्क्यांनी घसरला आहे. या समभागांवर विक्रीचा दबाव दिसून आला.

गुंतवणूकदारांचे १.५९ लाख कोटींचे नुकसान
बाजारात सोमवारी आलेल्या घसरणीच्या लाटेत गुंतवणूकदारांचे १.५९ लाख कोटी रुपयांची संपत्ती वाहून गेली. मुंबई शेअर बाजाराचे बाजार मूल्य १,५९,६२० कोटींवरून १,०२,६४,००३ पर्यंत घसरले आहे. सेन्सेक्समध्ये मागील चार सत्रांत १२०० हून जास्त अंकांची घसरण झाली आहे.