आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात किरकोळ वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशातील शेअर बाजार वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले असले तरी दिवसभराच्या व्यवहारात सुस्ती असल्याचे दिसून आले. मुंबई शेअर बाजारात ३० शेअरचा समावेश असलेल्या प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये शुक्रवारी २५ अंकांची वाढ नोंदवण्यात आली. सेन्सेक्स २६,१४२ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी १० अंकांनी वाढून ७९६३ च्या पातळीवर बंद झाला.

दिवसभरात झालेल्या व्यवहारात छोट्या शेअरमध्ये चांगली खरेदी झाली असल्याचे दिसून आले. २०१५ प्रमाणे छोट्या शेअरवर खरेदीदारांनी २०१६ मध्येदेखील विश्वास कायम ठेवला असल्याची नोंद झाली आहे. मुुंबई शेअर बाजारातील स्माॅलकॅप इंडेक्स ०.८८ टक्क्यांनी वाढून बंद झाले. मिडकॅप इंडेक्समध्ये समावेश असलेल्या रिलायन्स इन्फ्रामध्ये ९ टक्क्यांची, कंटेनर कॉर्पोरेशनमध्ये ६.८ टक्के, अदानी पॉवरमध्ये ५.८९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

रिअॅल्टी क्षेत्रात जास्त वाढ
देशातील शेअर बाजारात शुक्रवारी झालेल्या व्यवहारात रिअॅल्टी क्षेत्रात सर्वात जास्त वाढ नोंदवण्यात आली. यामध्ये १.८८ टक्क्यांची वाढ झाली आहे. इंडेक्समध्ये समावेश असलेल्या दहा शेअरपैकी आठ शेअर वाढीसह बंद झाले. डीएलएफ ४.६ टक्के, तर युनिटेक २.२६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. ऑटो क्षेत्रात ०.८९ टक्के वाढ नोंदवण्यात आली, तर बँकिंग क्षेत्रातील इंडेक्समध्ये ०.६९ टक्के वाढ झाली.

जागतिक बाजाराचा परिणाम
जागतिक बाजार बंद असल्यामुळेच देशातील शेअर बाजारात सुस्ती दिसत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी जगभरातील शेअर बाजार बंद होते. यामुळेच देशातील शेअर बाजारात जास्त उलाढाली झाल्या नाहीत. दिवसभराच्या व्यवहारात निवडक शेअरमध्ये खरेदी झाली.