आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग सहाव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 97 अंकांनी खाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू असलेली घसरण नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यातदेखील कायम राहिली. सेन्सेक्स आणि निफ्टी सलग सहाव्या सत्रात पडझडीसह बंद झाले.

जागतिक बाजारातून मिळालेल्या खराब संकेतांमुळे आणि तीन महिन्यांची जाहीर झालेली आकडेवारी कमजोर आल्यामुळे देशातील बाजार पडझडीसह बंद झाले. राष्ट्रीय शेअर बाजारात सोमवारी झालेल्या व्यवहारात मेटल, फार्मा आणि फायनान्शियल कंपन्यांच्या शेअरमध्ये माठ्या प्रमाणात घसरणीची नोंद झाली. तर ऑटो, एनर्जी, आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे बाजाराला थोडाफार दिलासा मिळाला.

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स ९७ अंकांच्या पडझडीसह २६,५५९ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी १५ अंकाच्या घसरणीसह ८०५० च्या पातळीवर बंद झाला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये घसरण
मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअरमध्ये विक्रीचा मारा दिसून आला. सीएनएक्स मिडकॅप इंडेक्स ०.२५ टक्क्यांनी पडून १३,२०६.५ च्या पातळीवर बंद झाला. तर दिवसभराच्या व्यवहारात मिडकॅप इंडेक्स १३,१०५ पर्यंत खाली आला, तर मुंबई शेअर बाजारातील स्मॉलकॅप इंडेक्स ०.२ टक्क्यांनी पडून ११,२९२ च्या पातळीवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात स्माॅलकॅप इंडेक्स ११,२२० च्या खाली आला होता.

मेटल ग्राहकोपयोगी वस्तू आणि फार्मा शेअरमध्ये विक्रीचा मारा वाढल्यामुळे दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजारातील मेटल, ग्राहकोपयोगी वस्तू आणि फार्मा इंडेक्समध्ये १.२५ ते ०.७ टक्क्यांच्या पडझडीची नोंद झाली. बँक निफ्टी ०.१ टक्क्यांच्या कमजोरीसह १७,३४० च्या पातळीवर बंद झाला. रिअॅल्टी, ऑइल आणि गॅस तसेच आयटी शेअरमध्ये थाेडीफार खरेदी झाली.

डाॅलरच्या तुलनेत रुपया घसरला
डाॅलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरणीची नोंद झाली आहे. २९ सप्टेंबरनंतरच्या नीचांकी पातळीवर रुपया बंद झाला. सोमवारी दिवसभराचा व्यवहार संपला तेव्हा डाॅलरच्या तुलनेत रुपया ६५.५८ वर बंद झाला. गेल्या आठवड्यात रुपया ६५.२६ वर बंद झाला होता. सरकारी बँकांसह काही खासगी बँकांनी केलेल्या डाॅलरच्या खरेदीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाली.

घसरणीचे कारण
जागतिक बाजारात पुन्हा एकदा दबाव दिसून येत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. याचा परिणाम देशातील बाजारावर देखील दिसून आला. तीन महिन्यांची मोठ्या कंपन्यांची जाहीर झालेली आकडेवारी देखील खराब होती. त्यामुळे देशातील उत्पादनाची गती देखील गेल्या २२ महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. याचा देखील नकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

जागतिक परिणाम होणारच
जागतिक बाजारातील स्थितीचा भारतीय बाजारावर परिणाम होणारच असल्याचे मत मायस्टॉक रिसर्चचे प्रमुख लोकेश उप्पल यांनी व्यक्त केले. जागतिक बाजारात कोणतीही खराब बातमी आली तर त्याचा सरळ परिणाम भारतीय बाजारावर देखील दिसून येईल. डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ करण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे बाजारावर दबाव निर्माण होईल, असेही उप्पल यांनी सांगितले.

बिहारचा परिणाम
बिहार निवडणुकीमध्ये महाआघाडीचा विजय अवघड दिसत आहे. अशा स्थितीत जर भाजपने विजय मिळवला तर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येईल. तीन महिन्यांच्या परिणामांमुळे बाजारात चढ-उतार सुरूच राहणार आहे. त्यामुळे चांगली आकडेवारी असलेल्या शेअरमध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.