आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवटच्या दिवशी बाजारात सुस्ती, सेन्सेक्समध्ये 39 अंकांची घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी मुंबई शेअर बाजारातील व्यवहार सपाटीवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये ३९ अंकांची, तर निफ्टीमध्ये एका अंकाच्या किरकोेळ घसरणीसह बाजार बंद झाला.

मुंबई शेअर बाजारातील बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स शुक्रवारी सकाळी सुस्तीसह सुरू झाला. एसबीआय सोडले तर अनेक मोठ्या कंपन्यांची आकडेवारी कमजोर आल्यामुळे दबाव कायम होता. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्स २४८ अंकाच्या मर्यादेत दिसून आला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स ३९ अंकाच्या घसरणीसह २६,२६५ च्या पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा प्रमुख इंडेक्स निफ्टी १.१५ अंकाच्या घसरणीस ७,९५४ वर बंद झाला.

बिहार निवडणुकीवर लक्ष : रविवारी बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे बाजाराचे संपूर्ण लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एनडीएचा पराभव झाल्यास बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे. तसेच जागतिक बाजारदेखील उच्चांकी पातळीच्या जवळपास आला आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार निवडक स्टॉक्सवर डाव लावून नफा कमावण्याची शक्यता आहे.

निफ्टीत आणखी घसरण
गेल्या अनेक सत्रांमध्ये सलग पडझडीची नोंद होत आहे. बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्येही चांगले संकेत मिळालेले नाहीत, त्यामुळे बाजारावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता मायस्टॉक रिसर्चचे लोकेश उप्पल यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी ७९३० च्या खाली आल्यास त्यात आणखी पडझड होऊन तो ७८५० पेक्षा खालची पातळी गाठू शकतो, असे मतही उप्पल यांनी व्यक्त केले.

तर शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात शुक्रवारी वाढीसह झाली होती. मात्र, गेल्या काही सत्रांमध्ये बाजारात सलग पडझड दिसून येत आहे. अशा परिस्थितीत बाजाराला एखाद्या सकारात्मक घटनेची प्रतीक्षा असल्याचे मत ग्लोब कॅपिटलचे नीरव बखारिया यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये एनडीएचे सरकार आल्यास बाजार थोडा सकारात्मक होईल, असेही त्यांनी सांगितले.

दिग्गज कंपन्यांची घसरण
बाजारातील सत्रादरम्यान अनेक मोठ्या कंपन्यांची तिमाही आकडेवारी जाहीर झाली. यामध्ये अधिकांश कंपन्यांच्या आकडेवारीत घसरण झाल्याचे दिसून आले. विशेषकरून बँक ऑफ बडाेदा, बीएचईएल, बाॅश आणि एम अँड एमची आकडेवारी अंदाजापेक्षा खूपच खराब आली, तर एसबीआयच्या अॅसेट क्वालिटीमध्ये सुधारणा आणि व्याजदरावरील उत्पन्न वाढल्यामुळे बँकेच्या नफ्यात मोठी वाढ नोंदवण्यात आली.