आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी : आठ दिवसांत घालवली दहा महिन्यांची वाढ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटबंदीमुळे देशाचा जीडीपी विकास दर कमी होण्याची शक्यता असल्याने बाजार दबावात आहे. सेन्सेक्सने या वर्षी आठ नोव्हेंबरपर्यंत मिळवलेली वाढ फक्त आठ दिवसांच्या व्यवहारात पूर्ण वाढ सपाटीवर आली आहे. अर्थव्यवस्थेत नगदी पैशांची कमतरता, विदेशी गुंतवणूकदारांच्या वतीने सुरू असलेला विक्रीचा मारा सुरू राहण्याची शक्यता आणि याच दरम्यान ब्रोकरेज हाउसेजने बाजाराच्या आधीच्या अंदाजात केलेली कपात यामुळे ही परिस्थिती आली आहे. याचा परिणाम सोमवारी सलग सहाव्या दिवशीदेखील दिसून आला. सेन्सेक्स ३८५.१० अंकाच्या (१.४७%) घसरणीसह २५,७६५.१४ च्या पातळीवर बंद झाला. ही पातळी ३१ डिसेंबर २०१५ च्या २६,११७.५४ च्या बंद पातळीच्याही खालची आहे. तर निफ्टी १४५ अंकाच्या (१.८०%) घसरणीसह ७,९२९.१० च्या पातळीवर बंद झाला. गेल्या सहा महिन्यांतील ही सर्वात नीचांकी पातळी आहे. यामध्ये ३१ जानेवारीनंतर सुधारणा होण्याची शक्यता असल्याचे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स २०१६ च्या शेवटापर्यंत ४ टक्क्यांच्या घसरणीसह २५,००० च्या जवळपास बंद होण्याची शक्यता असल्याचे मत ब्रोकरेज हाऊस डॉयचे बँकेने व्यक्त केले आहे. जागतिक पातळीवर आर्थिक सेवा देणाऱ्या या संस्थेने वर्षाच्या शेवटापर्यंत सेन्सेक्सच्या अंदाजात २००० अंकाची घट केली आहे. या आधी सेन्सेक्सने २७,००० चे उद्दिष्ट निश्चित केले होते. एफआयआय विकसनशील देशांच्या बाजारातून आपले पैसे काढत असल्याचे आता या संस्थेला वाटत आहे. यातून भारतीय बाजार दूर राहतील असे संस्थेला वाटत नाही.
घसरणीची प्रमुख तीन कारणे
देशात राजकीय वातावरण खराब होत असल्याचे दिसत आहे. संसदेतील विरोध जीएसटीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो.
नाेटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे बाजारात भीतीचे वातावरण आहे.
अमेरिकेत १४ डिसेंबरपासून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतासह सर्वच विकसनशील देशांच्या बाजारात विदेशी गुंतवणूकदारांची विक्री वाढू शकते.

विदेशी विक्रीचा मारा
विदेशी गुंतवणूकदार ऑक्टोबरपासून भारतीय बाजारात विक्री करत आहेत. त्यांनी गेल्या दीड महिन्यात १८ नोव्हेंबरपर्यंतच १४,१४७ कोटी रुपयांचे शेअर विक्री केले आहेत. असे असले तरी या वर्षी आतापर्यंतची त्यांची शुद्ध गुंतवणूक ३७,१४७ कोटी रुपयांची आहे.

बँक शेअरमध्ये विक्री
नगदीच्या कमतरतेमुळे बाजारातील वातावरण बिघडले असल्याचे मत जियोजित बीएनपी परिबाचे मुख्य संशोधक विनोद नायर यांनी व्यक्त केले. नोटबंदीचा फायदा मिळण्याची अपेक्षा वाढल्याने आतापर्यंत बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसून आली होती. मात्र, सोमवारी यामध्ये देखील विक्री दिसून आली. बँकेक्स २.८९ टक्क्यांच्या नुकसानीसह बंद झाला.
रुपया ८ महिन्यांच्या खालच्या पातळीवर
डॉलरच्या तुलनेत रुपया आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. हा तीन पैशाच्या नुकसानीसह बंद झाला. एका डॉलरची किंमत ६८.१६ रुपये राहिली जी गेल्या शुक्रवारी ही ६८.१३ होती.
छोट्या गुंतवणूकदारांचे “वेट अँड वॉच’
शेअर बाजारात विदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात विक्री करत असले तरी देशांतर्गत गुंतवणूकदार खरेदी करत आहेत. त्यामुळे ही घसरण खूप जास्त कालावधीपर्यंत सुरू राहील असे वाटत नाही. सध्या तरी छोट्या गुंतवणूकदारांनी वाट पाहावी. त्यांना पुढील काळात चांगले शेअर कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळू शकते.
-अजय बग्गा, बाजार विशेषज्ञ
बातम्या आणखी आहेत...