आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफारूपी विक्रीमुळे शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 184, तर निफ्टीत 68 अंकांची मोठी घसरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय शेअर बाजारात नफारूपी विक्रीचा मारा झाल्यामुळे बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही घसरण नोंदवण्यात आली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १८४ अंकांच्या घसरणीसह २८१५५ या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक असलेला निफ्टी ६८ अंकाच्या घसरणीसह ८७२४ या पातळीवर बंद झाला. बुधवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे १.२४ लाख कोटी रुपये बुडाले आहेत.  

निफ्टी-५० मध्ये समावेश असलेल्या ३८ समभागात घसरण नोंदवण्यात आली. तिसऱ्या तिमाहीत खराब कामगिरीमुळे टाटा मोटर्सच्या समभागामध्ये सर्वाधिक ९.४१ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. या व्यतिरिक्त सन फार्मामध्ये ४.२० टक्के, अरविंदो फार्मामध्ये ३.५५ टक्के, बँक आॅफ बडोदामध्ये ३.३७ टक्के आणि भेलमध्ये ३.३४ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.  

भारतीय शेअर बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारात वाहन, औषधी, धातू आणि रिअल्टी समभागामध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. सर्वाधिक घसरण निफ्टीच्या रिअल्टी इंडेक्समध्ये ३.९२ टक्क्यांची झाली. या व्यतिरिक्त निफ्टी वाहन निर्देशांकात ३.०३ टक्के, औषधी इंडेक्समध्ये १.७९ टक्के आणि धातू इंडेक्समध्ये १.४५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.  

स्मॉलकॅपमध्ये २०० अंकांची घसरण  
भारतीय बाजारात बुधवारी मोठ्या कंपन्यांच्या व्यतिरिक्त छोट्या आणि मध्यम कंपन्यांच्या शेअरमध्येदेखील विक्रीचा मारा दिसून आला.  मिडकॅप १५५ अंक म्हणजेच १.१६ टक्क्यांच्या घसरणीसह १३१८८ अंक आणि स्मॉलकॅप २०४ अंकांच्या घसरणीसह १३२३४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. बीएसई स्मॉलकॅपमध्ये नोंदणीकृत एमटी एडुकेअरमध्ये सर्वाधिक १७.८० टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...