Home | Business | Share Market | The lowest level in 7 months in the stock market

शेअर बाजारात 7 महिन्यांची नीचांकी पातळी, जास्त कर लावण्याच्या मोदींच्‍या संकेतांमुळे घसरण

वृत्तसंस्था | Update - Dec 27, 2016, 03:00 AM IST

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वर्ष २०१६ देखील खराब ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले.

 • The lowest level in 7 months in the stock market
  मुंबई - शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वर्ष २०१६ देखील खराब ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. निफ्टी ७७.५० अंकाच्या घसरणीसह ७,९०८ च्या पातळीवर बंद झाला, जी २४ मे नंतरची नीचांकी पातळी आहे. त्या वेळी निफ्टी ७,७४८.८५ च्या पातळीवर होता. सेन्सेक्स ०.९ टक्के म्हणजेच २३३.६० अंक खाली २५,८०७.१० च्या पातळीवर बंद झाला. २१ नोव्हेंबर नंतरचा हा नीचांक आहे. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सदेखील २८७ अंकांच्या घसरणीसह २४ मे च्या २५३०५.४७ च्या खाली पोहोचला होता. दोन्ही निर्देशांकांत गेल्या ११ दिवसांमधील ९ दिवस घसरण नोंदवण्यात आली आहे.

  नोटाबंदीमुळे गेल्या दीड महिन्यापासून शेअर बाजारात घसरण होत होती. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिलेले संकेत बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरले. शेअर बाजारात झालेल्या उत्पन्नावर जास्त कर लावण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. जास्त कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नावर कर लागणार नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी स्पष्ट केले होते. सध्या बाजारात सुटीचा मूड असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकेतांमुळे बाजारात नकारात्मकता आली असल्याचे मत ब्रोकरेज संस्था प्रभुदास लीलाधरने व्यक्त केले आहे. यामुळे गुंतवणूकदारांत संभ्रम निर्माण झाला आहे. जियोजित बीएनपी पारिबाचे आनंद जेम्स यांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे आधीच गुंतवणूकदार घाबरलेले असताना कर लागणार असल्याचे संकेत मिळाल्याने नकारात्मकता वाढली आहे.

  सेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० पैकी पाच शेअरमध्ये - हिंदुस्तान युनिलिव्हर (१.२५ टक्के), भारतीय एअरटेल (०.२५ टक्के), आयटीसी (०.११ टक्के) टीसीएस (०.०८ टक्के) आणि लार्सन अँड टुब्रो (०.०५ टक्के) तेजी नोंदवण्यात आली. सर्वाधिक घसरण होणाऱ्या शेअरमध्ये - सिप्ला (४.९४ टक्के), लुपिन (४.९४ टक्के), टाटा स्टील (२.६४ टक्के), ओएनजीसी (२.०७ टक्के) आणि भारतीय स्टेट बँक (२.०७ टक्के) यांचा समावेश आहे. निफ्टी सकाळी २०.६५ अंकांच्या घसरणीसह ७,९६५.१० अंकांच्या पातळीवर उघडला, होता त्यात ०.९७ टक्क्यांची घसरण झाली.
  ३ महिन्यांत घालवली ८ महिन्यांची वाढ
  बाजाराने वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत जितकी तेजी नोंदवली तितकी साडेतीन महिन्यांत घालवली. ३१ डिसेंबर २०१५ रोजी सेन्सेक्स २६११७.९० वर बंद झाला होता. सोमवारी हा २५,८०७.१० वर आला. म्हणजेच गेल्या वर्षभरानंतर सेन्सेक्स ३१०.८० अंकांनी घसरला आहे.

  नोटाबंदीनंतर ६.४६ टक्के घसरण
  नोटाबंदीच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरला सेन्सेक्स २७,५९१.१४ च्या पातळीवर बंद झाला. तेव्हापासून हा १,७८४ अंक म्हणजेच ६.४६ टक्के खाली आला आहे. निफ्टीतील एफएमसीजी निर्देशांक नोटाबंदीच्या आधी या वर्षी ८.५ टक्के वाढलेला होता. मात्र, आता तो २ टक्क्यांनी खाली आला आहे.
  बाजार ८ सप्टेंबरला वर्षाच्या उच्चांकावर
  सेन्सेक्स ८ सप्टेंबर रोजी या वर्षीच्या सर्वोच्च पातळीवर २९,०७७.८८ होता. त्या वेळी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता. तसेच सणासुदीचे दिवस असल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर निर्देशांकांत आतापर्यंत ३,२७० अंक म्हणजेच ११.२% घसरण झाली आहे.
  डॉलर मजबूत
  अमेरिकी अर्थव्यवस्थेसोबतच डॉलर मजबूत झाला आहे. यामुळे विकसनशील देशांमधून एफआयआय पैसे काढून घेत आहेत. पुढील वर्षापासून मॉरिशस आणि सिंगापूरच्या मार्गाने होणाऱ्या गुंतवणुकीवर ५० टक्के शाॅर्ट टर्म नफ्यावर कर लागणार असल्याचेही एक कारण आहे. डिसेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढून घेतले आहे.

  येथे करावी गुंतवणूक
  भारतीय बाजारात मोठ्या शेअर ठेवणाऱ्या एफएमसीजी व ऑटो कंपन्यांमध्ये गुंतवणूक योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक योग्य ठरू शकते. काही क्षेत्रावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. एफडीएने नियम कडक केल्याने कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो. नोटा बंदीमुळे बँकांचा एनपीए वाढू शकतो. आर्थिक मंदीमुळे ग्राहकोपयोगी वस्तू आणि दूरसंचार क्षेत्रावरही परिणाम होईल.

Trending